नांदूरशिंगोटे : दोन दिवसापूर्वी पोलीस जावायाने पत्नीसह सासू - सासऱ्यावर चाकूने हल्ला केल्याने तिघेही गंभीर जखमी झाले होते. दरम्यान सासरे निवृत्ती दामोदर सांगळे (52) रा. दोडी ता. सिन्नर यांचे उपचारादरम्यान रविवारी सकाळी निधन झाले. मुलीला वाचवण्यासाठी अंगावर चाकूचे वार झेलत जखमी झालेल्या पित्याने मृत्यूशी झुंज दिली पंरतु तीस तास झुंज देऊनही अखेर पित्याला मृत्यूने कवटाळले असून पत्नी व मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आरोपीला अटक करण्याची मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे.
शुक्रवारी(दि. 8) रात्री अकरा वाजता नाशिक ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेले सुरज देविदास उगलमुगले हा दोडी येथे सासरे निवृत्ती दामोदर सांगळे यांच्या घरी पत्नी पुजा हिला भेटण्यासाठी आला होता. पत्नी पुजा हिला घराबाहेर बोलावून मागील भांडणाची कुरापत काढून चाकूने सपासप वार केले. मुलीच्या किंचाळणे ऐकून वडील निवृत्ती मुलीला सोडविण्यासाठी पुढे आले पण कोणताही मागचा पुढचा विचार न करता सुरजने वार करने सुरूच ठेवले यामध्ये पोटात चाकू घुसल्याने निवृत्ती जागेवर कोसळले होते. तसेच यामध्ये पुजाची आई शिला सांगळे यांच्यावरही वार झाल्याने गंभीर जखमी झाले होते. आरडाओरडा ऐकल्या नंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु रक्तस्राव जास्त झाल्याने पुढील उपचारासाठी नाशिकच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान निवृत्ती सांगळे यांचे रविवारी सकाळी सहा वाजेदरम्यान उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची बातमी समजताच नातेवाईकांनी संताप व्यक्त करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. जोपर्यंत संशयित आरोपी सूरज यास अटक होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. सहाय्यक पोलीस आयुक्त माधुरी कांगणे यांनी नातेवाईक व ग्रामस्थांची समजून काढली त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आली. शवविच्छेदन झाल्यानंतर सायंकाळी दोडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे, मुलगी नातु असा परिवार आहे.