नाशिक : पितरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पंधरवडा अर्थात पितृपक्षास मंगळवारपासून (दि.२५) प्रारंभ होत आहे. श्राद्ध पक्ष, पिंडदान, नैवेद्य, भोजन, दानधर्म, सामजिक उपक्रमांद्वारे पितरांचे स्मरण करण्यावर लोक भर देणार असून, श्राद्धपक्षासाठी लागणाऱ्या साहित्याने बाजारपेठ गजबजून गेली आहे. केळीची पाने, पत्रावळी, काळे तीळ, फुले, फळे, पितृपक्षाच्या भाज्या आदी अनेक गोष्टींची दुकाने बाजारात दिसत आहेत. माता-पिता तसेच निकटवर्तीय हयात असताना त्यांची सेवाशुश्रुषा आपण धर्मपालन म्हणून करतो. त्याप्रमाणे त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्याप्रती आपले काहीतरी कर्तव्य असते, असे भारतीय संस्कृती सांगते. या कर्तव्यपूर्तीची सुसंधी श्राद्धाच्या निमित्ताने मिळते. आपल्या प्रिय निकटवर्तीयांचा मृत्यूतर प्रवास हा सुखमय व क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी यासाठी श्राद्धविधी आवश्यक असतो. पितृऋण फेडण्यासाठी श्राद्ध आवश्यक मानले जाते. आपल्या कुळातील ज्या मृत व्यक्तींना त्यांच्या अतृप्त इच्छांमुळे सद्गती प्राप्त झाली नसेल, त्यांच्या इच्छा-आकांक्षा श्राद्धविधींद्वारे पूर्ण करून त्यांना पुढची गती प्राप्त करून देणे. पितरांना श्राद्धाद्वारे त्या योनीतून मुक्त करणे. भाद्रपद प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंतच्या पितृपक्ष म्हणतात. या काळात पितर आपल्या कुटुंबीयांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात, अशी हिंदू धर्मीयांची श्रद्धा आहे.या काळात श्राद्ध केले असता पितर वर्षभर तृप्त राहतात. असे विविध हेतू श्राद्धविधी करण्यामागे आहेत. त्याची पूर्तता करण्याचे नियोजन घरोघरी पहायला मिळत आहे. याशिवाय काशी, प्रयाग, मातृगया, पितृगया इत्यादी पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन सर्व पितरांप्रीत्यर्थ श्राद्ध करण्याचेही नियोजन काही ठिकाणी पहायला मिळत आहे. या पारंपरिक श्राद्धविधींबरोबरच अनेक लोक आपल्या पितरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अनाथाश्रमात, वृद्धाश्रम, बालकाश्रम आदी ठिकाणी उपयोगी वस्तूंचे दान देण्यावर भरही देत आहेत.
पितृपक्षास मंगळवारपासून प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 12:25 AM