मनोज देवरे कळवणशहरातील शासकीय कार्यालये कोल्हापूर फाटा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत स्थलांतरित होऊ नये या कळवण शहरातील जनतेच्या आणि सर्व राजकीय पक्षांच्या विरोधाला मोडून काढत सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पधिकारी गंगाथरण डी यांनी कळवण शहरातील शासकीय कार्यालये कोल्हापूर फाटा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत स्थलांतरित करण्याचा लेखी फतवाच काढल्याने कळवण शहरात खळबळ उडाली आहे.कळवण येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे ६ फेब्रुवारी रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पधिकारी गंगाथरण डी यांनी कोल्हापूर फाटा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत स्थलांतर केले असून, १५ मार्चअखेरीस शहरातील शासकीय कार्यालये स्थलांतरित करण्याबाबतचे पत्र शासकीय कार्यालयाना आज प्राप्त झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कळवण शहरातील शासकीय कार्यालये स्थलांतराचा प्रश्न कोणत्या न कोणत्या कारणाने गाजत आहे. शिवाय कळवण शहरातील जनतेचा विरोध लक्षात घेऊन या विषयाला अनेकवेळा राजकीय पक्षांनी राजकीय रंग देऊन वेळोवेळी राजकीय पोळी भाजून घेतली. कळवण बंद, मोर्चा, आंदोलने करून सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी व व्यावसायिकांनी शासकीय कार्यालये स्थलांतराला विरोध दर्शविला आहे. जनमताचा शासकीय कार्यालये स्थलांतराला असलेला विरोध लक्षात घेऊन प्रशासकीय यंत्रणेने शासकीय कार्यालये स्थलांतराचा निर्णय घेऊ नये, अशी जनतेची इच्छा व मागणी असताना याप्रश्नी प्रशासकीय यंत्रणा पुढाकार घेत असल्याने सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रशासकीय यंत्रणेच्या निर्णयाला विरोध करून कार्यालये स्थलांतराचा निर्णय मोडून काढावा, अशी अपेक्षा कळवण शहरातील सर्वसामान्य व्यावसायिक व व्यापारी बांधवानी व्यक्त केली आहे.शासकीय कार्यालये स्थलांतरामुळे संबंधित कार्यालयाच्या समोरील व परिसरातील लहान व मोठ्या तसेच हातावरच्या व्यावसायिक बांधवांवर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. आर्थिक दळणवळण ठप्प होणार आहे तसेच काही कार्यालयामुळे कळवण शहरातील व्यापारी व व्यावसायिक पेठच उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.व्यापारी बांधवाची मागणीसन २०१६ या नवीन वर्षात शहरातील किमान भाडेतत्त्वावरील कार्यालये मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत स्थलांतरित होणार असल्याचे संकेत मिळाले होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतरही कार्यालये स्थलांतरित होतील म्हणून जानेवारी महिन्यात कळवण शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मोहनलाल संचेती, महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे उपाध्यक्ष विलास शिरोरे यांच्या नेतृत्वाखालील व्यापारी बांधवाच्या शिष्टमंडळाने व जिल्हा परिषदेचे सदस्य नितीन पवार, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार अनिल पुरे यांची भेट घेऊन निवेदन देत या प्रश्नी कळवणची जनता गंभीर असून, जर कार्यालये स्थलांतरित झाले तर व्यापारी पेठ उद्ध्वस्त होऊन कळवण शहर बकाल होईल त्यामुळे शासकीय कार्यालये स्थलांतरित करू नका अशा आशयाचे निवेदन देऊन याप्रश्नी मार्ग काढावा, अशी विनंती केली आहे. कळवण शहरातील जनतेच्या हिताचे निर्णय प्रशासकीय यंत्रणेने घ्यावे, जनतेचा विरोध लक्षात घेऊन शासकीय कार्यालये स्थलांतरित करू नये अशी मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष सुधाकर पगार यांनी केली आहे तर कळवण शहरातील शासकीय कार्यालये स्थलांतराचा प्रश्न म्हणजे सर्वसामान्य जनतेला व व्यापारी, व्यावसायिक यांच्यावर उपासमारीची वेळ आणणारा निर्णय असून, यंत्रणेने कार्यालये स्थलांतराचा निर्णय घेऊ नये, अशी मागणी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी अहेर यांनी केली आहे.
कार्यालये स्थलांतराचा फतवा
By admin | Published: February 25, 2016 10:15 PM