नाशिक : एकलहरे येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सीमध्ये सातत्य बिघाडल्याने वीजनिर्मिती संच बंद पडल्यामुळे सोमवारी जिल्ह्यासह शहरात अचानक अघोषित भारनियमन करण्याची वेळ आली. दरम्यान, महापारेषणच्या वीजवहन यंत्रणेतील बिघाडामुळे महानिर्मितीचे संच बंद पडल्याचा दावा औष्णिक वीजनिर्मिती केंद्राने केला आहे. एकलहरे येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात २१० मेगाव्हॉटचे प्रत्येकी तीन संच आहेत. पाणीटंचाईमुळे त्यातील एक संच बंद असून, उर्वरित दोन संचांमधून वीजनिर्मितीचे कार्य सुरू आहे. रविवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास वीजनिर्मिती संचातील व्होल्टेज कमी झाला आणि फ्रिक्वेन्सीही निर्धारित मानांकाच्या खाली आल्याने २१० मेगाव्हॉटचे दोनही संच ट्रिप झाले. त्यामुळे केंद्रातील संपूर्ण वीजनिर्मिती बंद पडली. यामुळे महावितरणला जिल्हा भरात तातडीने भारनियमन करावे लागले. सुमारे पाच ते सहा तास संपूर्ण वीजनिर्मिती बंद झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात विजेचा तुटवडा निर्माण होऊन शहर, जिल्ह्यात वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडला. अचानक भारनियमन करण्याची वेळ आल्यामुळे नाशिककरांचे दैनंदिन वेळापत्रक कोलमडून पडले. विशेष म्हणजे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असताना शहरातील वीज कर्मचाऱ्यांना कोणतेही सबळ कारण सांगता येत नव्हते. वीजपुरवठा खंडित होण्यामागे केवळ तांत्रिक बिघाड असल्याचे सांगण्यात येत असल्याने वीज केव्हा उपलब्ध होणार याची कोणतीही माहिती नागरिकांना मिळत नव्हती. वीज कर्मचारीदेखील या बिघाडाबाबत अनभिज्ञ दिसून आले.
एकलहरे औष्णिक वीज केंद्रात बिघाड
By admin | Published: June 20, 2016 11:30 PM