इंदिरानगर : वासननगर भागातील एका चाळीत राहणाऱ्या महिलेचे १२ ग्रॅमचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने घरातून लांबविल्याची घटना घडली होती. या गुन्ह्याचा तपास करताना इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी शक्कल लढविली. पोलीस ठाण्याचे पाळीव श्वान ‘चिंगी’ला संशयित रहिवाशांसमोर आणले आणि ‘चोरट्यास ओळख, चिंगी...’ असे फर्मान सोडले. यावेळी उपस्थितांमधील एका अल्पवयीन मुलाने श्वान चावा घेईल, या भीतीपोटी गुन्ह्याची कबुली दिली आणि चोरलेले मंगळसूत्र काढून पोलिसांना दिले.
इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या आवारात सुमारे पाच ते सहा वर्षांपूर्वी एक पांढऱ्या रंगाचे भटके श्वान आले होते. या श्वानाला पोलिसांचा लळा लागला आहे. पोलीस ठाण्यातील सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही त्या श्वानाचा लळा लागला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांनी त्याच्यासाठी खास ‘डॉग फुड’ची बॅगच आणून ठेवली आहे. हे श्वान प्रशिक्षित नसले तरीदेखील पोलिसांच्या सहवासात राहून हे श्वानही चोर अन् साव ओळखू लागले आहे.
राणेनगर पोलीस चौकीत महिला तक्रार देण्यासाठी आल्या असता त्याठिकाणी असलेले हवालदार सुरेश भोजने व पंकज हासे यांनी त्यांची तक्रार घेतली आणि सर्व चाळीतील रहिवाशांना पोलीस ठाण्याच्या इमारतीत हजर राहण्यास सांगितले. रहिवासी आले असता मंगळसूत्र चोरी केल्याची कोणीही कबुली देण्यास तयार नव्हते. घरातील कपाटावर काढून ठेवलेले मंगळसूत्र चोरट्याने लंपास केले होते.
पोलिसांनी ‘चिंगी’ला जवळ बोलावून घेत शक्कल लढविली. श्वान प्रशिक्षित नाही, हे केवळ पोलिसांना माहीत आहे; मात्र रहिवाशांना त्याची कल्पना नसल्याने त्या युक्तीचा वापर करत भोजने यांनी ‘आता, हे श्वान तुमच्यामधूनच चोराला ओळखून त्याच्याकडून मंगळसूत्र असल्याचे दाखवून देईल’ असे सांगितले. यामुळे उपस्थित सर्वच रहिवाशांची भंबेरी उडाली. यावेळी एका अल्पवयीन मुलाने श्वान आपल्याला चावा घेईल, या भीतीपोटी गुन्ह्याची कबुली देत मी मंगळसूत्र चोरी केले आहे, घरी कोणी नव्हते, त्यावेळी कपाटावरून मंगळसूत्र गायब केल्याचे सांगितले आणि पटकन मंगळसूत्र काढूनही दिले. पोलिसांनी लढविलेली ही शक्कल गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पूरक ठरली.
---
फोटो आर वर ०६डॉग नावाने सेव्ह आहे.
===Photopath===
060221\06nsk_12_06022021_13.jpg
===Caption===
इंदिरानगर पोलीस ठाण्यातील पाळीव श्वान ‘चिंगी’