लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : परिसरात शुक्र वारी पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागल्याने मोरेमळा परिसरातून वाहणाऱ्या नाल्याजवळून रस्ता ओलांडत असताना एक शाळकरी मुलगा वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. पंचवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत संबंधित मुलाचा शोध घेण्याचे काम सुरू केले. परंतु संध्याकाळी उशिरापर्यंत मुलाला शोधण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले नाही.मोरे मळा परिसरात नाल्याजवळून रस्ता ओलांडत असताना एक १० वर्षाचा मुलगा पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेला. परिसरातील काही व्यक्तींनी ही घटना पाहिल्याने त्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. सकाळी साडेअकरा वाजता ही घटना घडली असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. पावसामुळे नाल्यातील वाहत्या पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने संबंधित मुलगा वाहून गेल्याचा अंदाज परिसरातील नागरिकांनी वर्तविला. पावसामुळे नाल्याच्या पाण्याची पातळी वाढली असताना संबंधित मुलगा नाल्याला लागून असलेल्या खडकावरून रस्ता ओलांडत होता. यावेळी त्याचा पाय घसरून पाण्यात पडला व पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेला. तो मुलगा नाल्यात वाहून जात असल्याचे परिसरातील काही महिला तसेच मनपा घंटागाडी कर्मचाऱ्यांनी बघितले. त्यांनी आरडाओरडा करीत परिसरात मदतीसाठी धावा केला. परंतु पाण्याचा प्रवाह अधिक तीव्र असल्याने मदतकार्य करता आले नाही. नाल्याला वाहत्या पाण्याचा प्रवाह असल्याने तत्काळ पोलीस तसेच अग्निशमन दलाला माहिती कळविण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दल स्थानिक नागरिकांनी वाहून गेलेल्या मुलाचा शोध संध्याकाळी उशिरापर्यंत शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, शोधकार्यात यश आले नाही. दरम्यान, संध्याकाळी उशिरापर्यंत या भागात कोणत्याही पालकांनी मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, संध्याकाळी उशिरापर्यंत वाहून गेलेल्या मुलाला शोधण्याचे प्रयत्न सुरू होते.
शाळकरी मुलगा नाल्यात वाहून गेल्याची भीती
By admin | Published: July 14, 2017 5:53 PM