नाशिक : भीती हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू असून जीवनात असामान्य कर्तृत्व करायचे असेल तर सर्वप्रथम मनात असलेल्या भीतीला पराभूत करण्याची गरज आहे. मनात भीती बाळगल्याने आपल्यामधील क्षमतांचा विसर पडतो आणि कायम मनात भीती बाळगल्याने आपल्याला आपल्या क्षमता विसरण्याची सवयी होऊन त्याचा परिणाम कामावर होतो. त्यातून विविध प्रकारची संकटे निर्माण होत असल्याचे प्रतिपादन लाइफ स्कूलचे संस्थापक नरेंन गोईदानी यांनी केले.के. के. वाघ शिक्षण संस्थेतर्फे रावसाहेब थोरात सभागृहात मंगळवारी (दि.१९) कर्मवीर काकासाहेब वाघ स्मृती व्याख्यानमालेचे ४८ वे पुष्प गुंफताना नरेंन गोईदानी यांनी ‘चलो कुछ कमाल करें’ या विषयावर व्याख्यान देताना मनुष्याच्या जीवनात भीतीमुळे होणारे परिणाम याविषयी मार्गदर्शन करताना त्यापासून दूर राहण्याचे विविध पर्यायही सुचविले. ते म्हणाले, की जीवनात अनेक आव्हाने येतील, अपयशाला सामोरे जावे लागेल. परंतु प्रतिकाराची शक्ती आपल्यात असेल तर आपल्यावर भीती हावी होणार नाही. चांदोरी येथील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर उपासनी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या व्याख्यानप्रसंगी व्यासपीठावर के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एन. नांदूरकर, तंत्रनिकेतनचे प्राचार्य पी. टी. कडवे, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एस. जैन, चांदोरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. जी. वाघ, प्रा. डॉ. एस. एस. साने आदी उपस्थित होते.
भीती हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू : नरेंन गोईदानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:31 AM