नाशिक : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी घोषित होण्याच्या शक्यतेने जिल्हा परिषदेत नवीन कामांचे कार्यारंभ आदेश घेणे, देयके पास करून घेणे व नवीन कामांना मान्यता मिळविण्यासाठी ठेकेदारांची गर्दी होवू लागली असून, सकाळपासून तर सायंकाळपर्यंत संपूर्ण परिसर ठेकेदारांच्या वावराने गजबजून जात आहे. शिवाय आचारसंहितेच्या कात्रीत गटाची कामे अडकू नये म्हणून जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यही दररोज तळ ठोकून आहेत.जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात अनेक कामे केली जातात. गेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्ते सुधार कार्यक्रमांतर्गत जवळपास शंभर कोटींचे कामे मंजूर करण्यात आली असून, यंदाही आजपावेतो सुमारे ५० कोटींच्या कामांना मंजुºया देण्यात आल्या आहेत. या कामांना प्रशासकीय मान्यता व तांत्रिक मान्यताही देण्यात आलेली आहे. त्याचबरोबरच समाजकल्याण खात्याच्या वतीने दलित वस्ती सुधार योजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, याशिवाय समाज कल्याण व महिला बाल कल्याण विभागाच्या व्यक्तिगत योजनांनाही यापूर्वीच मंजुरी देण्यात येऊन त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील बिगर आदिवासी भागात १६३ अंगणवाड्या बांधकामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेली आहे. लघुपाटबंधारे विभागाने सिमेंट बंधाऱ्यांची दुरुस्ती व नवीन बंधाºयांच्या कामे सुरू करण्यात आली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात जवळपास तीन महिन्यांचा कालावधी आचारसंहितेत निघून गेल्याने जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प झाले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होऊन विविध विभागांचा निधी अखर्चित राहण्याची भीती पदाधिकारी, सदस्यांकडून व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने कामकाजात गतिमानता आणावी अशा सूचना यापूर्वीच अधिकाºयांना देण्यात आलेल्या असल्याने आता निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याची शक्यता असल्याने गेल्या आठवड्यापासून जिल्हा परिषदेला ठेकेदारांचा गराडा पडला आहे. पदाधिकाºयांची दालनेही त्यामुळे फुल्ल होत असून, गटातील कामे आचारसंहितेपूर्वी मंजूर करून प्रत्यक्ष कामे सुरू व्हावीत यासाठी सदस्यांचीही धडपड वाढली आहे.ठेकेदार मंडळी सकाळपासूनच जिल्हा परिषदेत दाखल होवून अधिकारी, पदाधिकाºयांच्या दालनांचे उंबरठे झिजवित असून, विशेष करून बांधकाम व वित्त विभागात फाइलींचा प्रवास या टेबलावरून त्या टेबलावर वाढला आहे. काही विभागांचे कामकाज रात्रीच्या ११ वाजेपर्यंत या काळात सुरू असून, सर्वांनाच आचारसंहितेची भीतीने ग्रासले आहे.ठेकेदारच फिरवितात फाइलीबांधकाम विभागात तर कर्मचारी कोण व ठेकेदार कोण हेच कळेनासे झाले आहेत. स्वत: ठेकेदारच फाइली फिरविण्याची कामे करीत असून, काहींनी कर्मचाºयांच्या टेबल, खुर्च्यांचा ताबा घेतला आहे. यात जिल्हा परिषद सदस्यही मागे नाहीत. नवीन कामांचे कार्यारंभ आदेश तसेच झालेल्या कामांची देयके काढण्यासाठी होत असलेल्या गर्दीने जिल्हा परिषदेचे आवार गर्दीने फुलून जात आहे.
आचारसंहितेच्या भीतीपोटी जिल्हा परिषदेत ठेकेदारांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 1:41 AM
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी घोषित होण्याच्या शक्यतेने जिल्हा परिषदेत नवीन कामांचे कार्यारंभ आदेश घेणे, देयके पास करून घेणे व नवीन कामांना मान्यता मिळविण्यासाठी ठेकेदारांची गर्दी होवू लागली असून, सकाळपासून तर सायंकाळपर्यंत संपूर्ण परिसर ठेकेदारांच्या वावराने गजबजून जात आहे.
ठळक मुद्देपदाधिकारी, सदस्यांचीही धावपळ : फाइलींचा प्रवास गतिमान