नाशिकरोड : कोरोना विषाणूमुळे सर्वजण त्रस्त असताना नाशिकरोड परिसराच्या काही भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांना इतर आजारांना तोंड देण्याची पाळी आली आहे. याकडे कोणीच गांभीर्याने लक्ष देत नसल्याने रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.गेल्या सात महिन्यांपासून कोरोना विषाणूच्या उपद्रवामुळे सर्वजण त्रस्त झाले आहेत. यामध्ये अनेकांचे बळी गेले आहेत. शासन व नागरिक हातात हात घालून लढा देत असताना दुसरीकडे मात्र मनपा प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नाशिकरोड भागातील जय भवानीरोड, देवळालीगाव, आर्टिलरी सेंटररोड व इतर भागांमध्ये गेल्या काही दिवसापासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांना विविध आजाराशी सामना करावा लागत आहे. दूषित पाणी रहिवाशांना उकळून व गाळून पिण्याची पाळी आली आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार करून सुद्धा दुर्लक्ष केले जात आहे. पाणीपुरवठ्याची पाईपलाईन लिकेज असल्याचा संशय असून त्यामधून दूषित पाणी मिसळले जात आहे. पाण्याचा दुर्गंधी सारखा वास येत आहे. तसेच पाण्यामध्ये दूषित पाणी व घाण मिसळत असल्याने नागरिकांना जुलाब, घशाचा त्रास, अंग दुखणे आदी त्रास होत आहे. त्यामुळे फॅमिली डॉक्टरकडे रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. मनपा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ दूषित पाणीपुरवठा रोखता कसा येईल त्याचे उपाय योजना करणे गरजेचे आहे.