येवला/नाशिक : येवला, मनमाड शहरासाठी पालखेड धरणातून सोडण्यात आलेल्या कालव्याच्या पाण्यात येवला तालुक्यातील पाटोदा, महालखेडा येथील तिघे बापलेक बुडाल्याची भीती व्यक्त केली जात असून, एकजण बचावला आहे. सोमवारी दुपारी ४ वाजेदरम्यान ही घटना घडली. रात्री उशिरापर्यंत तिघांचा शोध घेण्याचे काम सुरू होते.सोमनाथ शिवराम गिते (३६), सत्यम सोमनाथ गिते (१२) व कार्तिक सोमनाथ गिते (१४) रा. महालखेडा, पाटोदा असे या तिघे बुडणाºयांची नावे आहेत. गेल्या आठवड्यापासून पालखेड धरणातून येवला, मनमाड व अन्य पाणीपुरवठा योजनांसाठी ८५० दशलक्ष घनफूट पाणी एक्स्प्रेस कालव्यातून सोडण्यात येत असून, दुपारी ४ वाजता सोमनाथ गिते हे आपले दोन मुले व मावस भावासह कॅनॉलच्या बाजूने जात असताना ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले. गिते यांचे मावसभाऊ पाण्यातील पाइपलाइनचा आधार घेतल्यामुळे अडकून पडले मात्र सोमनाथ गिते व त्यांचे दोन्ही मुले मात्र पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. पोलीस व महसूल खात्याच्या अधिकाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेण्यात आला. त्यासाठी धरणातून सोडण्यात येणाºया पाण्याच्या विर्सगात कपात करण्यात आली.