तालुक्यात चार-पाच दिवसांपासून ढगाळ हवामान असल्यामुळे त्याचा पिकांना फटका बसत आहे. अवकाळी पाऊस , त्यानंतर काश्मिरसारखे गडद धुके यामुळे द्राक्ष उत्पादक निराशेच्या गर्तेत सापडला आहे. पावसामुळे घडकुज , मिलीबग, डावणी , भुरी यासारखे रोगांचा प्रार्दूभाव होण्याची भिती शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. तसेच रब्बीचा हंगाम सुरु झाल्यानंतर पाऊस चांगला होता , वातावरणही चांगले असताना मागील रविवारपासून ते गुरुवारपर्यत तीन दिवस पाऊस, दोन दिवस ढगाळ वातावरण आणि आता गडद धुके पसरत असल्याने शेतकऱ्यांच्या सर्वच पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसेल असे जाणकार शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे.चार दिवसांपासून तपमानाचा पारा घसरत चालल्याने द्राक्ष उत्पादक कमालीचे धास्तावले आहेत. जास्त थंडीमुळे निर्यातक्षम द्राक्षाची फुगवण मिळणे अवघड होते तसेच अती थंडीमुळे औषध फवारणीचा खर्च देखील दुप्पट होतो. यासोबतच धुके आणि ढगाळ वातावरणामुळे हरभरा, गहू, मका आणि भाजीपाला या पिकांचेही नुकसान होण्याची शक्यता आहे. गुरुवारी सकाळी संपूर्ण दिंडोरी तालुका धुक्यात हरवल्याचे चित्र दिसून आले. या धुक्यामुळे आणि थंडीमुळे पाणी उतरलेल्या द्राक्षांच्या मण्यांना तडे जाण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.
दिंडोरी तालुक्यात धुक्यामुळे द्राक्षांना तडे जाण्याची भिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 6:58 PM
पांडाणे : दिंडोरी तालुक्यात प्रामुख्यांने नगदी पिक म्हणून घेतल्या जाणाऱ्या द्राक्षांना धुक्यामुळे तडे जाण्याची भीती व्यक्त होत असून रब्बी पिकांनाही ढगाळ हवामान, अवकाळी पाऊस व दवबिंदूंमुळे मावा व करपा आदी रोगांनी विळखा घातल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
ठळक मुद्देनिराशा : रब्बीच्याही नुकसानीची शक्यता