नाशिक : दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेला कोरोनाचा नवा व्हेरिएंट हा अधिक घातक आणि अधिक वेगाने पसरणारा असल्याने सर्वत्र चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून संवाद साधला असून, त्यानुसार नाशिक जिल्ह्यात लागलीच दक्षता घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना लागलीच क्वारंटाइन केले जाणार आहे, तर कॉन्टेक्ट ट्रेसिंगवर भर दिला जाणार आहे. दरम्यान, नाशिककरांना मास्क वापरण्याची सक्ती केली जाणार असून विनामास्क असणाऱ्यांवर दुप्पट दंड केला जाऊ शकतो.
मुख्यमंत्र्यांशी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनंतर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नाशिककरांना अधिक दक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे. याविषयी त्यांनी अधिक माहितीदेखील दिली. कोरोनाचा ओमिक्रॉन हा नवा व्हेरिएंट अधिक घातक आणि अधिक वेगाने फैलावणार आहे. त्यामुळे पहिल्या दोन लाटेपेक्षा यंदा नागरिकांना अधिक दक्षता बाळगावी लागणार आहे. यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यानुसार ओझर विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करून त्यांना क्वारंटाइन करण्याची सूचना करण्यात आली आहे. हा व्हेरिएंट तिसऱ्या लाटेचे कारण ठरू शकणारा असल्याने मास्क, डिस्टन्स आणि लसीकरण या त्रिसूत्रीनुसार अंमलबजावणी करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
एकूणच या व्हेरिएंटचा वेग लक्षात घेता आपल्याकडे असलेल्या आरोग्य यंत्रणेचा पुन्हा आढावा घेतला जाणार आहे. जिल्ह्यात अपेक्षित बेड्सची सज्जता आहे त्याप्रमाणचे ऑक्सिजनदेखील उपलब्ध आहे. त्याबाबत आरोग्य यंत्रणेला नियोजनाच्या सूचना करण्यात येणार आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संख्येचादेखील आढावा घेऊन त्यांना तत्पर राहण्याच्या सूचना केल्या जाणार आहेत. व्हेरिएंटचा वेग लक्षात घेता यंत्रणा कमी पडू नये यासाठी यंत्रणा सक्षम करण्यासाठीचे नियोजन करण्यावर अधिक भर असेल.
नागरिकांनी दक्षता बाळगावी
कोरोनाचे संकट पुन्हा डोकावत असल्याने नागरिकांनी अधिक दक्षता घेतली पाहिजे. आता आपली जबाबदारी अधिक वाढलेली आहे. कोरोना नियंत्रणासाठी टास्क फोर्सने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यानुसार व्यवस्थित मास्क वापरावा लागणार आहे. डिस्टन्स नियमांचे पालन करणे अपेक्षित असून अनावश्यक गर्दी करण्याचे टाळले पाहिजे. यासंदर्भातील सूचना महापालिका आणि आरोग्य यंत्रणेला देण्यात आलेल्या आहेत.
- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी