देवळा तालुक्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात सापडू लागले होते. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी १ एप्रिलपासून दहा दिवस देवळा तालुक्यात जनता कर्फ्यू पुकारण्यात आल्यामुळे दुकाने बंद होती. त्यानंतर शासनाच्या लॉकडाऊनमुळे कडक निर्बंध घालण्यात आले होते. यामुळे महिनाभरापासून देवळा शहरातील दुकाने बंद होती. त्याचे सकारात्मक परिणाम होऊन नियमित सापडणाऱ्या कोरोना रूग्णांची संख्या सुरुवातीला स्थिर झाली व नंतर ती हळूहळू कमी होऊ लागली. जनतेची गैरसोय होऊ नये व अत्यावश्यक सेवा म्हणून शासनाने निर्धारित केलेल्या सकाळी ७ ते ११ ह्या वेळेत किराणा दुकान, भाजीपाला विक्रेते आदींना कोरोना नियमांचे पालन करून दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिलेली आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय दूर झाली. परंतु ह्या निर्धारित वेळेत दुकाने सुरू असतांना कोरोना नियमांचे सर्वत्र उल्लंघन होत आहे. सामान व भाजीपाला खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत असून फिजिकल डिस्टन्सिंगचे सर्वत्र उल्लंघन होत आहे. काही अपवाद सोडले तर दुकानदार देखील ग्राहकांनी कोरोना नियमांचे पालन करावे याकडे दुर्लक्ष करत असून व्यवसाय वाढीकडे लक्ष ठेवताना दिसत आहेत. देवळा शहरात सुरुवातीला नियमितपणे तीस ते बत्तीस कोरोना रूग्ण सापडत असताना सध्या ती संख्या दहाच्या आत आलेली आहे. शहरातील कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी पोलीस व नगरपंचायत प्रशासनाने घेतलेल्या परिश्रमांनाच श्रेय द्यावे लागेल. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये व कोरोना नियमांचे पालन करावे यासाठी दिवसभर ह्या यंत्रणा सज्ज असतात. पाच कंदील परिसरात पायी फिरणारे नागरिक व वाहन चालकांना पोलीस घराबाहेर पडण्याचे कारण विचारताना दिसतात. सबळ कारण नसेल तर दंडात्मक कारवाई करतात. यामुळे इतर वेळी नियमांचे काटेकोरपणे पालन होत असताना सकाळी ७ ते ११ या वेळेत मात्र पोलीस व नगरपंचायत प्रशासनाचे अस्तित्व जाणवत नाही. सर्रास नियमांच्या होणाऱ्या उल्लंघनाकडे त्यांचे लक्ष कसे जात नाही असा प्रश्न नागरिकांना पडला असून सकाळी ७ ते ११ ह्या वेळेत शहरात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करावी व कोरोनापासून शहराला दूर ठेवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
देवळा तालुक्यात गर्दीमुळे बाधित वाढण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2021 4:14 AM