ओतूर : पावसाळा संपत आला तरी ओतूर परिसरात जोरदार पाऊस झालेला नसल्याने ओतूर धरण कोरडे असून, परिसरातील खरीप हंगामही वाया जाण्याच्या मार्गावर आहे.मृग नक्षत्राच्या पावसावर मुळाणे, नरूळ, मेहदर, कन्हेरवाडी, वडाळे, कुंडाणे, शिरसमणी, भुसणी आदि भागातील शेतकऱ्यांनी अत्यंत कमी पावसावर मका, भुईमूग, उडीद, बाजरी, सोयाबीन आदि खरीप पिकांची पेरणी केली होती. रिमझिम पावसावर या पिकांना जीवदान मिळाले होते. ओतूर धरणात पाणीसाठा न झाल्याने पिकांना पाणी देता आले नाही. धरणाखालील मार्कंडेय नदीला आजही पाणी वाहत नसल्याने नदी कोरडीठाक पडली आहे. महिनाभरापासून खरीप पिके जळून गेल्याने शेतकऱ्यांनी पिकांची अपेक्षा सोडून दिली आहे. जनावरांना चारा उपलब्ध न झाल्याने पशुपालक हवालदिल झाला आहे. पिण्याच्या पाण्याचीही स्थिती गंभीर होऊ लागली आहे. चारा, पाणीटंचाईला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांनी केलेली लाल कांद्याची रोपे पाण्याभावी जळून गेली आहेत. पावसाअभावी रब्बी पिकांचीदेखील अपेक्षा शेतकऱ्यांनी सोडून दिली आहे. गेल्या तीन वर्षांपासून परिसरात दुष्काळी परिस्थिती आहे. पावसाअभावी खरीप पिके जळून जात असल्याने शेतकरी शेतातील उभा मका जनावरांसाठी चारा म्हणून कापून टाकत आहेत. शेतकऱ्यांनी महागडी बियाणे कर्ज काढून घेतली होती, तर काहींनी हातउसनवार पैसे घेतले होते. पाऊस नसल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ महादेवाची पिंडी पाण्यात बुडवून पावसाची आळवणी करीत आहेत. लोकांना अजूनही पावसाची अपेक्षा असून, परतीचा जोरदार पाऊस बरसल्यास जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न काहीअंशी सुटेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)पोळा सणावर दुष्काळाचे सावट
ओतूर : परिसरात पावसाने पाठ फिरविल्याने भयानक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, पोेळा सणावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. आधीच वाढलेल्या महागाईने सर्वसामान्य नागरिक पोळलेला असून, जनावरांना चारा नाही. शेतकऱ्यांच्या दारापुढे बैलजोड्या आहेत तर चारा नाही अशी परिस्थिती आहे. दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांमध्येही उत्साह नाही. कुंभार समाजातही नैराश्य आहे. त्यामुळे मातीच्या बैलांवरदेखील दुष्काळाची छाया पडली आहे. मातीच्या लहान बैलजोडीची किंमत २० रुपये असून, मोठ्या मातीची बैलजोडी ५० रुपयाला आहे. त्यामुळे मागच्या वर्षीपेक्षा यंदा मातीचे बैलही महागले आहेत. पोळा सणाला बैलजोडी सजविण्यासाठी लागणारा साजही महाग झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्य पसरले आहे. बैल सजविण्यासाठी लागणाऱ्या शांब्या तोडे ५०० ते ६०० रुपये किलो दराने मिळत आहेत. माठोेठ्या २०० ते ३०० रुपये जोडी आहे. नाथा १०० रुपये, पैंजण ३०० रुपये जोडी दराने मिळत आहे. इतर रंगरंगोटीही कमालीची महाग झाल्याने दुष्काळी वातावरणात बैल सजवावे तरी कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.