नाशिक : मूळचे मध्यप्रदेश येथील रहिवासी असलेले मात्र मागील काही वर्षांपासून शहरात स्थायिक झालेल्या एका परप्रांतीय कुटुंबाला तिडके काॅलीनमधील त्यांच्या राहत्या पत्र्याच्या खोलीत जाऊन आठ संशयितांच्या टोळक्याने कोयत्याचा धाक दाखवून सुमारे ९ हजार रुपयांचा ऐवज हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली.
सोमवारी (दि.२) मध्यरात्रीच्या सुमारास संशयित शुभम ऊर्फ रिंक्या सुभाष भामरे (२४, रा. कालिका मंदिरामागील परिसर), विक्रांत नाना सोनवणे (२६, रा. आरटीओजवळ), गगन शंकर विधाते (२५, रा. सहवासनगर), ओंकार दादासाहेब लोंढे (२१, रा. डीजीपीनगर), किरण सुभाष भामरे, शरद फुलसुंदर, रोहित माने, विश्वा वाघमारे या संशयितांच्या टोळक्याने लाकडी दंडुका, लोखंडी सळी, कोयता घेऊन फिर्यादी दीपक रमेश वास्कले (२१) यांच्या तिडके कॉलनीत सुरू असलेल्या एका गृहप्रकल्पाच्या ठिकाणी पत्र्याच्या खोलीत शिरकाव केला. वास्कले हे सहकुटुंब तेथे वास्तव्यास आहेत. टोळक्याने त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी त्यांच्या ताब्यातील मोबाइल, सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा ९ हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने हिसकावून पोबारा केला. याप्रकरणी वास्कले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुंबईनाका पोलीस ठाण्यात आठ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सहा संशयितांना अटक केली आहे. त्यापैकी शुभम, गगन, ओंकार यांच्याविरोधात याअगोदरही गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.