नाशिक : येथील कीर्ती कलामंदिर कथक नृत्य संस्थेच्या सहसंचालक तथा ज्येष्ठ नृत्यांगना रेखा नाडगौडा यांच्या शिष्या अदिती नाडगौडा-पानसे यांना भारत सरकारची ज्युनिअर रिसर्च फेलोशिप जाहीर झाली आहे. अखिल भारतीय स्तरावर कथक नृत्य क्षेत्रातील केवळ ५ कलावंतांना ही फेलोशिप प्राप्त झाली आहे. त्यामध्ये अदिती यांचा समावेश आहे. नाशिकमध्ये कथक नृत्यासाठी सरकारची फेलोशिप प्राप्त करणाऱ्या त्या पहिल्या कथक नृत्यांगना ठरल्या आहेत.भारत सरकारकडून भारतीय शास्त्रीय कलांचा सर्वांगीण विकास व त्यांचे श्रेष्ठत्व जपण्यासाठी नवनवीन शोध प्रबंध लिहिले जावेत, जेणेकरून शास्त्रीय कलांचा अभ्यास करणाºया नव्या पिढीला मार्गदर्शक तत्त्वे मिळतील म्हणून दरवर्षी भारत सरकारकडून फेलोशिप दिली जाते. दरवर्षी २५ ते ४० वयोगटासाठी ज्युनिअर फेलोशिप आणि त्यानंतर सिनियर फेलोशिप दिली जाते. या संशोधनात्मक कामासाठी भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडून अर्ज मागविण्यात आले होते. शोधनिबंधाचा आराखडा तपासून त्याचे भविष्यकालीन परिमाण समजून घेऊन त्या आधारे फेलोशिपसाठी निवड करण्यात येते.अदिती नाडगौडा-पानसे या कथक नृत्य विषयामध्ये अलंकार आणि एम.ए झालेल्या आहेत. त्यांनी ही कला ज्येष्ठ कथक नृत्यांगना गुरू रेखा नाडगौडा आणि पं. शमा भाटे यांच्याकडून आत्मसात केली आहे. त्यांना तालयोगी पंडित सुरेश तळवलकर, पंडित बिरजू महाराज यांसारख्या दिग्गजांचे मार्गदर्शन मिळाले आहे. नाशिकमधून पहिल्यांदाच कथक नृत्यांगनेला भारत सरकारने अशाप्रकारे आपली फे लोशिप देऊन गौरविले आहे. यामुळे राष्टÑीय स्तरावर नाशिकचे नाव उंचविले गेल्याचे रेखा नाडगौडा यांनी सांगितले. तसेच यापुढेदेखील असेच प्रयत्न करून कथकसारख्या शास्त्रीय कलेच्या विकासाकरिता योगदान देत सिनीअर फेलोशिप मिळविण्याचा मानस अदिती यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
नृत्यांगना अदिती नाडगौडा यांना फेलोशिप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 12:33 AM