नाशिक : मनपाच्या डॉ. सुवर्णा वाजे यांच्या जळीत मोटारीत पोलिसांना आढळलेल्या हाडांचा डीएनए चाचणी अहवाल अखेर ग्रामीण पोलिसांना बुधवारी (दि.२) प्राप्त झाल्याचे सुत्रांनी सांगितले. या अहवालात वाजे यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या डीएनए आणि जळालेल्या हाडांचा डीएनए एकसमान असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे डॉ.वाजे यांना त्यांच्या कारमधून शहराबाहेर घेऊन जात निर्जन ठिकाणी मोटारीत पेटवून देत घातपात करण्यात आल्याचे ग्रामीण पोलिसांनी निष्पन्न केले आहे.
महापालिकेच्या माेरवाडी सिडको येथील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात कार्यरत डॉ. सुवर्णा संदीप वाजे (३८, रा. कर्मयोगीनगर) या मंगळवारी (दि.२५) रात्रीपासून बेपत्ता झाल्या आहेत. त्यांच्या पतीने अंबड पाेलीस ठाण्यात याबाबत तक्रारही दाखल केली आहे. मात्र महामार्गालगत रायगडनगरजवळ वाजे यांची मोटार त्याच रात्री पुर्णपणे जळालेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आल्याने खळबळ उडाली होती. गाडीच्या चेसिज क्रमांकावरून मोटार वाजे यांच्या मालकीची असल्याची खात्री पटली खरी मात्र मोटारीत मिळालेली जळालेली हाडे कोणाची? याचा उलगडा पोलिसांना होत नव्हता. यामुळे वाजे बेपत्ता की मृत्युमुखी याबाबतही पोलिसांनी कुठल्याही प्रकारचा निष्कर्ष काढलेला न्हवता. वैद्यकिय चमुकडून ती हाडे महिलेची आहेत, इतकेच सांगण्यात आले होते. मात्र हाडे कोणत्या महिलेची हा प्रश्न कायम होता. त्यामुळे डॉ. वाजे यांच्या वडिलांचा डीएनए नमुना संकलित करुन पोलिसांनी हाडे न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेकडे (फॉरेन्सिक) तपासणीसाठी पाठविले होते. या तपासणी अहवालाची पोलिसांना आठवडाभरापासून प्रतीक्षा होती. दरम्यान, बुधवारी रात्री उशिरापर्यंत अहवाल प्रयोगशाळेकडून पोलिसांना देण्यत आल्याचे खात्रीलायक सुत्रांकडून समजले. मात्र या अहवालाबाबत पोलिसांकडून गोपनीयता पाळली जात आहे.
वाजे यांच्या माहेरच्या लोकांकडून पती संदीप यांच्यावर संशय
डॉ. सुवर्णा वाजे यांचे वडील तसेच त्यांच्या भगिनी आणि रुग्णालयातील त्यांचे सहकारी तसेच पती संदीप वाजे यांचा जाबजबाब ग्रामीण पोलिसांकडून नोंदविण्यात आला आहे. माहेरच्या नातेवाइकांनी दिलेल्या जबाबावरून आता पोलिसांचा तपासाला गती देण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे. माहेरच्या लोकांनी पती संदीप वाजे यांच्यावर संशय घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे वाजे यांचे पती संदीप वाजे यांची बुधवारी पुन्हा दोन ते अडीच तास पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान पोलिसांना असलेल्या काही संशयास्पद बाबी उघड झाल्याचेही बोलले जात आहे.