सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. नांदूरशिंगोटे ते दोडी रस्त्यादरम्यान गोपाळकृष्ण लॉन्ससमोर हा अपघात झाला. अज्ञात वाहनाच्या धडकेत दीड वर्षाची मादी जागीच ठार झाली.
सोमवारी रात्री ते मंगळवारी पहाटेच्या दरम्यान या महामार्गावर दीड वर्षाची मादी बिबट्या रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला. मंगळवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती वनविभागाला दिली.
सिन्नरचे वनपरिमंडळ अधिकारी प्रवीण सोनवणे, नांदूरशिंगोटेचे वनरक्षक के. आर. इरकर, वनपाल पी. ए. सरोदे, वनकर्मचारी संतोष मेंगाळ, जगन जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृत बिबट्याला मोहदरी वनउद्यानात नेण्यात आले. सिन्नर पंचायत समितीचे तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद भणगे यांनी मृत बिबट्याचे शवविच्छेदन केले. त्यानंतर मोहदरी वनउद्यानात मृत बिबट्याला अग्निडाग देण्यात आल्याची माहिती वनरक्षक के. आर. इरकर यांनी दिली.
चौकट-
पाण्यासाठी भटकंती
एप्रिल महिन्यात कडाक्याचे ऊन पडल्याने अनेक ठिकाणी पाणीसाठे आटले आहेत. जंगली प्राण्यांना जंगलात पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने ते मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. सदर मादी बिबट्या रात्रीच्या वेळी पाणी व भक्ष्याचा शोध घेत असावी, असा अंदाज आहे. महामार्ग ओलांडत असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने या बिबट्या मादीचा जागीच मृत्यू झाला.
नांदूरशिंगोटे जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत गतप्राण झालेला बिबट्या. (२७ सिन्नर बिबट्या)
===Photopath===
270421\27nsk_6_27042021_13.jpg
===Caption===
२७ सिन्नर बिबट्या