लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : प्रसूतीसाठी खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रसूतीपूर्वीच महिला पोलीस शिपाई असलेल्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना सिन्नर येथे दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. मयत स्वाती पंढरीनाथ सोनवणे (२३) या सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाण्यात महिला पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होत्या. स्वाती सोनवणे यांचे माहेर कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील असून त्यांना सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथे कांदळकर कुटुंबात सून म्हणून दिले होते. वावी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सोनवणे या तीन आठवड्यांपासून प्रसुती रजेवर होत्या. शुक्रवारी त्यांना सिन्नरच्या खासगी रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले होते. शनिवारी दुपारी त्यांची तब्येत बिघडल्याने दुसऱ्या रुग्णालयात प्रसुतीसाठी हलविण्यात आले होते. तथापि, त्यांचा मृत्यू झाला होता. मयत सोनवणे यांना दीड वर्षाचा मुलगा असून दुसऱ्या बाळंतपणासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोनवणे यांच्या मृत्यूप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन सुुरु होते.
महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
By admin | Published: May 21, 2017 1:00 AM