नाशिक : स्वाइन फ्लूने शहरासह जिल्ह्यात थैमान घातले असून, मंगळवारी शेतकºयासह महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली.खासगी रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या सिन्नर तालुक्यातील महिलेचा मंगळवारी (दि़ १८) मृत्यू झाला़ वैशाली काळे (५०, रा. दोडी, ता. सिन्नर) असे मृताचे नाव आहे़ आतापर्यंत स्वाइन फ्लू व स्वाइन फ्लूसदृश आजाराने शहर व जिल्ह्यातील २४ जणांचा मृत्यू झाला आहे़ वैशाली काळे यांच्यावर गत काही दिवसांपासून खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने मंगळवारी जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात दाखल करण्यात आले होते. परंतु काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा स्वॅब पुण्याच्या प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आला असून, अहवालानंतर त्यांचा मृत्यू स्वाइन फ्लूने झाला की नाही हे स्पष्ट होणार आहे़दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षामध्ये सद्यस्थितीत १६ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यापैकी ६ रुग्ण हे पॉझिटिव्ह आहेत. या कक्षामध्ये दाखल असलेल्या स्वाइन फ्लू झालेले ११७ रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे़
शेतकऱ्यासह महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 1:18 AM