नाशिक : येथील बाजार समितीत भाजीपाल्याची आवक स्थिर असून, दरांमध्ये ५ ते १० टक्यांनी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात सध्या मेथीला सरासरी ५.५० रुपये, तर कांदापातीला २४ रुपये जुडीचा दर मिळत आहे. किराणा बाजारात या सप्ताहात काहीशी मंदी जाणवली. त्यामुळे सर्व किराणामालाचे भाव स्थिर आहेत. फळबाजारात फळांची आवक काहीशी घटल्याने फळांच्या दरांमध्ये तेजी आली आहे. कांद्याचे भाव घसरत असताना बटाटा, टमाट्याचे भाव टिकून असून, घाऊक बाजारात सरासरी २७.५० रुपये किलो दराने बटाट्याची विक्री होत आहे. कोथिंबिरीची आवक वाढल्याने कोथिंबिरीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. फळभाज्यांमध्ये फारसा चढउतार झालेला नाही. या सप्ताहात फळांची आवक कमी झाल्याने फळबाजार तेजीत आहेत. डाळिंब सरासरी ३२ रुपये किलोने विकले जात आहेत, तर सफरचंदाच्या भावात वाढ झाली असून, सरासरी ८० रुपये किलोने सफरचंदांची विक्री होत आहे. किराणा बाजारात या सप्ताहात कोणत्याही वस्तूमध्ये चढउतार झालेला नाही.
चौकट -----
वांगी उतरली
मागील दोन सप्ताहांपर्यंत वांग्याला चांगला दर मिळत होता. या सप्ताहात वांग्याचे दर उतरले असून, बटाटा मात्र तेजीत आहे. पालकाची जुडी, तर मातीमोल भावाने विकली जात असून, घाऊक बाजारातील सरासरी अडीच रुपये जुडीचा दर आहे.
चौकट -
स्ट्रॅाबेरीचे आगमन
फळबाजारात स्ट्रॉबेरीचे आगमन झाले असून, किरकोळ बाजारात साधारणत: ६० रुपये किलो दर आहे. काही फळविक्रेत्यांकडे आंब्याचेही आगमन झाले असून, २०० ते २८० रुपये किलोचा दर त्याला मिळत आहे.
चौकट -
किराणा बाजारात शांतता
नवीन पीक बाजारात आल्याने किराणा बाजारात फारशी उलाढाल झालेली नाही. यामुळे सर्व डाळींसह तेलाचे भाव या सप्ताहात स्थिर राहिलेत. दिवाळीपूर्वी किराणा बाजारात अचानकपणे आलेली तेजी आता कमी होऊ लागली आहे.
कोट -
सध्या खाद्यतेलाचे भाव डब्याला १९०० रुपयांपर्यंत गेले आहेत. मार्चपर्यंत खाद्यतेलांच्या भावात तेजी राहण्याची शक्यता असून, डब्याचे भाव दोन हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- अनिल बूब, किराणा व्यापारी
कोट -
कांद्याचे भाव उतरत असतानाच पालेभाज्या आणि फळभाज्यांचेही भाव उतरल्याने या मालावर होणार खर्चही वाया गेला असून, शेतकऱ्यांनी आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. बदलत्या हवामानाचाही भाजीपाला उत्पादनावर परिणाम होत आहे.
- अशोक दौंडे, शेतकरी
कोट -
दिवाळीनंतर किराणामालामध्ये फारशी वाढ झाली नसल्याने दिलासा मिळत आहे. घाऊक बाजारात शेतकऱ्यांना कमी भाव मिळत असला तरी किरकोळ विक्रेतेमात्र आमच्याकडून अधिक पैसे घेतात. त्यामुळे स्वस्त भाजीपाल्याचा लाभ मिळत नाही.
- शोभना निकम, गृहिणी