नाशिक : खरिपाचा हंगाम तोंडावर आलेला असताना मार्च-एप्रिल महिन्यांत खतांच्या किमतीत वाढ झाल्यानंतर ही दरवाढ सातत्याने सुरूच असल्याने शेतकरी चिंताक्रांत झाला आहे. खतांच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या फॉस्फेरिक अॅसिडची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत वाढल्याने वेगवेगळ्या प्रकारच्या खतनिर्मिती कंपन्यांची कच्च्या मालाची आयात महागली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढीच्या झळा थेट सर्वसाधारण शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहचल्या असून, खरिपाला आता खाद्य देण्याची गरज असताना खतांच्या किमतीत जवळपास १०ते १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. वेगवेगळ्या पिकांसाठी प्रमुख्याने वापर केल्या जाणाºया डीएपी खताच्या किमतीत एका बॅगमागे ३१ मार्चनंतर जवळपास २१० रुपयांनी वाढ झाली आहे, तर वेगवेगळ्या वर्गवारीतील एनपीके खतांच्या किमतीतही मोठ्या प्रमाणात झाली आहे. यातील १०-२६-२६च्या एका बॅगच्या मार्चमधील १०६० ते ७० रुपये असलेल्या किमती एप्रिल महिन्यात ११८६ रुपयांपर्यंत वाढल्या असून, यात जवळपास ११० रुपये वाढ झाली आहे. २४-२४-१० च्या किमतीतही १८५ रुपयांनी वाढल्या असून, १२-३२-१६ च्या किमती १२२ रुपयांनी वाढल्या आहेत. युरियाच्या किमतीत सध्याच्या स्थितीत फार मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे दिसत नसले तरी युरियाच्या पॅकिंगचे वजन कमी करण्यात आले आहे. पूर्वी २९५ रुपयांना ५० किलोग्रॅमच्या पॅकिंगमध्ये येणारी युरियाची पिशवी आता ४५ किलोची करण्यात आली असून, ती २६५ ते २७५ रुपयांना मिळत आहे. खतांची पुरेशी उपलब्धता खरिपाच्या हंगामात शेतकºयांना खतांची टंचाई जाणवू नये यासाठी बाजारपेठेत मुबलक प्रमाणात खते उपलब्ध करून देण्यात आली असून, यात मेरीट आॅफ पोटॅश (एमओपी) वर्गातील खतांसह, डीएपी, सिंगल सुपर फॉस्फेट, अमोनियम सल्फेट आदी विविध प्रकारची खते सध्या उपलब्ध आहेत. मात्र नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाने ओढ दिल्याने पिके वाळू लागली आहे. त्यामुळे शेतक-यांकडून खतांची उचल घटली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
खरिपावर खतांच्या भाववाढीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 1:53 AM