सायखेडा : कोरोनाचे संकट, सततचा लॉकडाऊन, पडलेले बाजार भाव नैसर्गिक आपत्ती, बेमोसमी पाऊस यामुळे शेती अगोदर तोट्यात असताना, रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमतीने बळीराजाला शॉकच बसला आहे. रासायनिक खतांचा वापर केला नाही, तर पीक जोमात येणार नसल्याची भीतीही आहे, तर शासनाने रासायनिक खत आणि त्या संदर्भातील कंपन्या यांच्यावरील शासन अनुदान काढून घेतल्यामुळे किमती वाढल्याचे बोलले जात आहे.
लवकरच खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. शेतीच्या मशागतीची कामे सुरू झाली आहेत. काही दिवसांत मृग नक्षत्र येणार आहे, मृग नक्षत्र सुरू झाले की, खरीप हंगामातील नगदी पिकांची लागवड सुरू होते. पीक जोमाने वाढावे, यासाठी लागवडीनंतर अवघ्या चार दिवसांत रासायनिक खतांची मात्रा द्यावी लागते. सुरुवातीपासून रासायनिक खत दिल्यावर पीक जोमात वाढायला सुरुवात होते. खत नसेल तर पीक जमीन सोडत नाही, त्यामुळे खत महत्त्वाचे असते. खतांच्या वाढलेल्या किंमत आणि डिझेलचे वाढलेले दर यामुळे शेतीची मशागत आणि पिकासाठी येणारा खर्च शेतकऱ्यांचे डोकेदुखी ठरत आहे. भरघोस पीक घेण्यासाठी येणारा खर्च वाढून त्या तुलनेत बाजार भाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पादन दुप्पट करणार असलेले सरकार शेतकऱ्यांचा खर्च मात्र दुप्पट करत आहे. शेती आणि शेतकरी समृद्ध होण्यासाठी शेती उपयोगी साधने यांच्यावरील कर कमी करून शेतकऱ्यांना सवलत द्यावी, अशी मागणी होत आहे.
--------------------
अशी झाली दरवाढ
खताचा प्रकार जुने दर नवीन दर
डीएपी १२०० १९००
पोटॅश ८५० १०००
१०:२६:२६ १२५० १७७५
१०:२६:१६ ११८५ १८००
१६:१६:१६ ११७५ १४००
---------------
खरीप हंगामाच्या सुरुवातीला रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती पिकांचा खर्च वाढवणार आहे.
वाढलेल्या खर्चाच्या तुलनेत मालाला भाव मिळत नाही, त्यामुळे शेती तोट्यात जात आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असा एकही निर्णय केंद्र सरकार घेत नाही.
- रामा राजोळे, अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना निफाड
--------------
डिझेलचे भाव गगनाला भिडले, त्यामुळे मशागतीचा खर्च वाढला आणि आत्ता रासायनिक खतांच्या किमती प्रचंड वाढवून शेतकऱ्यांना शेतात पीक उभे करताच आले नाही पाहिजे, असा बंदोबस्त सरकार करत आहे.
शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्याऐवजी खर्च मात्र काही पट वाढविला आहे.
- गणेश पोटे, शेतकरी, भुसे