नाशिक : गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या पितृपक्षाची सांगता होताच नवरात्राच्या निमित्ताने उत्सवी वातावरण सुरू झाले आहे. त्यामुळे बाजारपेठांना झळाळी आली असून, वाढत्या गर्दीमुळे चैतन्य निर्माण झाले आहे. सणासुदीचे दिवस असल्याने व्यावसायिकांनीदेखील विविध आॅफर्स दिल्या आहेत.सामान्यत: पितृपक्षात शुभ कार्य टाळले जाते. त्यामुळे पंधरा दिवस बाजारपेठांमध्ये संमिश्र वातावरण असते. परंतु पितृपक्ष संपताच सुरू होणारे नवरात्र, त्यापाठोपाठ दसरा आणि दिवाळी या मोठ्या सणांमुळे अत्यंत उत्साही वातावरण सुरू होते. बाजारपेठेतही त्यामुळे चैतन्य निर्माण होत असते. मंगळवारी सर्वपित्री अमावस्या झाल्यानंतर बुधवारी बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे बाजारपेठा पुन्हा गजबजल्या. मेनरोड, सराफ बाजार आणि कापडपेठेत तर गर्दीमुळे पाऊल ठेवायला जागा नव्हती. नवरात्राच्या पार्श्वभूमीवर नवीन खरेदी सुरू झाली असून इलेक्ट्रॉनिक्स, मोटारी, सराफी पेढ्या, मोबाइल शॉपीसह सर्वच ठिकाणी ग्राहकांची वर्दळ दिसून आली. घरे खरेदीलाही उत्साह आला आहे. रियल इस्टेट क्षेत्रातही आता चांगल्या प्रतिसादाची चिन्हे दिसत आहेत.सणासुदीच्या वातावरणामुळे व्यावसायिकांनी विविध आॅफर्स दिल्या असून, कपडे खरेदीवर सूट तर मोबाइलसह काही वस्तुंवर शून्य व्याजदराने हप्ते भरून खरेदीच्या योजना जाहीर झाल्या आहेत.
उत्सवी वातावरणामुळे बाजारपेठांमध्ये झळाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 1:04 AM