घोटी : इगतपुरी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या शिरसाटे गट अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी आरक्षित झाल्याने या गटातून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा आणि मनसेने आपापले उमेदवार उभे केले आहेत.विस्ताराने सर्वात मोठ्या असलेल्या शिरसाटे व खंबाळे गणांचा समावेश असलेल्या या गटात राष्ट्रवादीचे मागील पाच वर्षांत वर्चस्व होते. गोरख बोडके यांनी मागील निवडणुकीत बाजी मारीत राष्ट्रवादीच्या ताब्यात हा गट घेतला होता. इतर गटाच्या तुलनेत या गटात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाल्याने राष्ट्रवादी त्याच बाबीचा निवडणूक प्रचारात फायदा करून घेईल असे अपेक्षित होते; मात्र या गटाचे आरक्षण बदलून ते अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाल्याने अनेक इच्छुकांचे मनसुबे उधळले गेले.उमेदवारी करण्याच्या हेतूने राष्ट्रवादी ते शिवसेना असा एका दिवसाचा प्रवास केलेल्या हिरामण कौटे यांना ऐनवेळी दोन्ही पक्षाकडून उमेदवारी नाकारल्याने त्यांनी मनसेची कास धरत पत्नी राजूबाई कौटे यांची या गटातून मनसेकडून उमेदवारी केली तर याच गटात भाजपने कल्पना बोंबले याना उमेदवारी दिली आहे.हा गट माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्याकरीता प्रतिष्ठेचा आणि राजकीय अस्तित्वाचा बनला आहे.
शिरसाटे गटात बहुरंगी सामना
By admin | Published: February 16, 2017 11:15 PM