नाशिक : स्टाफ सिलेक्शन स्पर्धा परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि.५) जवळपास १५ उमेदवारांना अल्पशा विलंबामुळे परीक्षेला मुकावे लागले. विशेष म्हणजे या उमेदवारांमध्ये निश्चित वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचलेल्या एका महिला उमेदवाराचा समावेश असून, ही महिला तिच्या ओळखपत्रावर जन्मतारीख नमूद नसल्याने दुसरे ओळखपत्र घेण्यासाठी बाहेर पडली होती. परंतु तिलाही पुन्हा परीक्षा कें द्रात सोडण्यात न आल्याने परिसरात काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. इंदिरानगर-वडाळा परिसरांतील आयऑन डिजिटल झोन येथे ४ ते ९ मार्च या कालावधीत स्टाफ सिलेक्शन परीक्षा सुरू असून, याठिकाणी शहरासह संपूर्ण जिल्हाभरातून व परिसरातून अनेक उमेदवार परीक्षा देण्यासाठी येतात. परंतु, शहराच्या मध्यवर्ती भागापासून हे परीक्षा केंद्र काहीसे दूर असून, या भागात पोहोचण्यासाठी पुरेशी वाहतूक व्यवस्थाही उपलब्ध नसल्याने अनेक उमेदवार परीक्षेपासून वंचित राहण्याचे प्रकार घडतात. अशा उमेदवारांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे परीक्षेचे सुल्क अदा करून सर्वप्रक्रिया पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना एक किंवा दोन मिनिटांच्या विलंबाने पोहोचल्यामुळे परीक्षेची संधी गमवावी लागते. असाच प्रकार गुरुवारी (दि.५) आयऑन डिजिटल झोन या परीक्षा केंद्रावर घडला असून, याठिकाणी सुमारे १५ विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिल्याची माहिती येथे परीक्षेसाठी आलेल्या एका परीक्षार्थीने दिली आहे. परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी या उमेदवारांना केवळ एक ते दोन मिनिटांचा विलंब झाला होता. तरी त्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याने उमेदवारांकडून तीव्र नाराजी व्यक्त करताना परीक्षा पद्धती आणि नियोजनात परिस्थितीचा विचार करून बदल करण्यासोबत संधी चुकलेल्या परीक्षार्थींना दुसऱ्या दिवशी अथवा अखेरच्या दिवशी परीक्षेची पुन्हा संधी देण्यात यावी, अशी मागणी परीक्षेपासून वंचित राहिलेल्या उमेदवारांनी केली आहे.
दोन मिनिटांच्या विलंबाने पंधरा उमेदवार मुकले स्टाफ सिलेक्श्न परीक्षेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2020 10:15 PM