नाशिक : निफाड तालुक्यातील विमान दुर्घटनेत नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या पंचनाम्याविषयी प्रशासनातील अधिकाऱ्यांनाच संशय आहे. सात शेतक-यांचे सुमारे पंधरा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा काढलेला अंदाज अवास्तव वाटत असल्याने कृषी अधीक्षकांनी नव्याने पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.२७ जून रोजी ओझर विमानतळावरून चाचणीसाठी उड्डाण घेतलेल्या सुखोई या लढाऊ विमानात तांत्रिक दोष निर्माण झाल्याने ते निफाड तालुक्यात शेतजमिनीवर कोसळले होते. दुर्घटनेत पाच ते सात शेतगटांतील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. बागा जमीनदोस्त झाल्या. एका शेतकºयाच्या शेतात मोठा खड्डा झाल्याने नजीकच्या काळात याठिकाणी शेती करणे शक्य नसल्याचे दिसून आले होते.निफाडच्या उपविभागीय अधिकाºयांनी तलाठी, मंडल अधिकाºयांना तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. कृषी सहायकाच्या मदतीने पंचनामे करण्यात येऊन त्यात सुमारे पंधरा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करणारा अहवाल प्रशासनाला सादर करण्यात आला.इतक्या मोठ्या प्रमाणावर शेतीपिकाच्या झालेल्या नुकसानीवर विश्वास ठेवण्यास शासकीय यंत्रणा तयार नसून, यासंदर्भात निफाड उपविभागीय अधिकाºयांनी तालुका कृषी अधिकाºयांना पत्र पाठवून पंचनामे करण्यात कृषी खात्याने संवेदनशीलता दाखविली नसल्याचा ठपका ठेवत वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. जिल्हा प्रशासनानेही अहवाल पुन्हा जिल्हा कृषी अधीक्षकांकडे पाठवून दिला असून, त्यांना फेरपंचानामा करण्याच्या सूचना केल्या आहेत.
विमान दुर्घटनेत शेतीचे पंधरा कोटींचे नुकसान; फेरपंचनाम्याच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 11:47 PM