उमराणे : गेल्या तिन चार दिवसांपासून कांदा दरात कमालीची वाढ झाल्याने येथील बाजार समितीत सायकल, मोटरसायकल आदी वाहनांतुन कॅरेट, गोण्यांमधुन किरकोळ कांदा विक्र ीसाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी गर्दी केली असुन त्यामुळे बाजार समितीला भाजीमंडीचे स्वरूप आले आहे. बुधवारी बाजारात एका कॅरेटमधुन अवघा पंधरा किलो कांदाही विक्रीसाठी आल्याने एकीकडे भाववाढीचा परिणाम व उत्पादनात आलेली घट लक्षात येते. गेल्या सहा ते सात महिन्यांपूर्वी चाळीत साठवून ठेवलेला उन्हाळी कांदा संपला असुन सद्यस्थितीत या कांद्याची नगण्य आवक होत आहे.तर दुसरीकडे गेल्या तीन महिन्यांपूर्वी नविन लाल कांदा लागवडीसाठी टाकलेली रोपे ऐन कांदा लागवडीच्यावेळी जोरदार पावसामुळे खराब झाल्याने कांदा लागवडीवर याचा विपरीत परिणाम झाला. या परिस्थितीतही काही शेतकऱ्यांनी जीवाचे रान करु न रोपे वाचविली होती. या काही अंशी शिल्लक असलेल्या रोपांवर कांदा लागवड झाली असतानाच पुन्हा परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने लावलेले कांदेही जास्त पावसामुळे खराब झाले आहेत. शिवाय गेल्या एक ते दीड महिन्यांपासून ढगाळ वातावरण व धुक्यामुळे कांदा पिकाला पोषक वातावरण नसल्याने सद्यस्थितीत लाल कांद्याच्या उत्पादनात कमालीची घट आली आहे. परिणामी कांद्याला मागणी वाढल्याने कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढलेल्या कांदा दरामुळे शेतकºयांना खुप पैसे मिळतात ही कल्पना चुकीची असुन एका एकरात अवघे एक ते दोन क्विंटल कांदे निघत असुन त्यांची प्रतवारीही कमालीची घसरल्याने बाजारात त्या कांद्याना चार ते पाच हजार रु पये भाव मिळत आहे. त्यामुळे कांदा पिकांसाठी केलेला खर्च पाहता ह्या कांद्यापासुन मिळणारा नफा तर दूरच परंतु उत्पादनासाठी केलेला खर्चही वसुल होत नसल्याचे शेतकºयांनी बोलुन दाखविले. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून बाजारभावात वाढ होत असल्याने आजही बाजारभाव वाढुन पंधरा हजाराचा टप्पा गाठेल अशी अपेक्षा असतानाच आज बुधवार (दि.४) रोजी सकाळच्या सत्रात उन्हाळी कांद्याच्या दरात ६००रु पयांनी घसरण होत १३ हजार ३०० रु पये तर लाल कांद्यांच्या दरात १७०० रु पयांनी घसरण होत ८ हजार ३०० रु पये दराने विक्र ी झाला.
तेजीमुळे अवघा पंधरा किलो कांदाही विक्रीला...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2019 2:48 PM