कोरेानाच्या संकट काळात दुसऱ्या लाटेत रुग्णांना मदत व्हावी यासाठी केंद्र शासनाने पीएम केअर फंडातून ६० व्हेंटिलेटर्स महापालिकेला दिले हेाते. २० एप्रिल रोजी महापालिकेला मिळालेल्या या ६० व्हेंटिलेटर्स पैकी ४५ व्हेंटिलेटर्स नवीन बिटको रुग्णालयात, तर १५ व्हेंटिलेटर्स डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात पाठविले होते. मात्र पुरवठादार कंपनीने सेन्सर, स्टँडसह अन्य साहित्य पुरवले नाही. त्यामुळे हे व्हेंटिलेटर पडून होते. यासंदर्भात महापालिकेचे कोविड सेलचे प्रमुख डॉ. आवेश पलोड यांनी दिल्ली स्थित पुरवठादार कंपनीशी संपर्क साधला. यावेळी पुरवठादार कंपनीने व्हेंटिलेटर्स शिवाय अन्य पूरक सुटे साहित्य पुरवण्याची जबाबदारी आपली नसल्याचा दावा केला. त्यानंतरही महापालिकेने पाठपुरावा केल्यानंतर शनिवारी (दि.२२) कंपनीचे अभियंता नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांनी डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात असलेल्या जुन्या १८ पैकी १५ व्हेंटिलेटर्स बदलले आणि नवीन व्हेंटिलेटर्स चाचणीसाठी बसवले आहेत. तसेच येथील सॉफ्टवेअरदेखील अपडेट केले आहे. रविवारी (दि.२३) बिटको रुग्णालयातील ४५ व्हेंटिलेटर्सची चाचणी करून ते कार्यान्वित करून दिले जाणार आहे.
इन्फो...
सर्व व्हेंटिलेटर्स सुरू झाले तरी महापालिकेकडे पुरेसे फिजिशियन आणि तंत्रज्ञ नाही. त्यामुळे ४५ पैकी काही नवीन व्हेंटिलेटर्स मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉ. वसंत पवार रुग्णालयाला मागणीनुसार दिले जाण्याची शक्यता आहे.