नाशिक : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणारी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) कोरोनाच्या संकटामुळे यापूर्वी दोन महिने पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा आता आणखी पुढे ढकलण्यात आली असून सुधारीत वेळापत्रकानुसार ही परीक्षा २३ मे २०२१ रोजी होणार आहे. तर परीक्षेसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज सादर करण्यासोबतच शुल्क भरण्यासाठी १० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज शाळांनी ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून करण्यात आल्या असून संकेतस्थळावर याविषयी अधिक माहिती उपलब्ध आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही परीक्षा यंदा २५ एप्रिलला एकाच वेळी घेतली जाणार होती. परंतु, या नियोजनात बदल करण्यात आला असून आता २३ मे रोजी ही परीक्षा होणार असून अद्याप ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज सादर करण्यात आलेले नाहीत, त्यांचे अर्ज १० एप्रिलपर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शासनमान्य शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षेला प्रविष्ट होता येणार आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात ही परीक्षा होते. मात्र यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने ही परीक्षा एप्रिलमध्ये घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याने आता ही परीक्षा आणखी पुढे ढकलण्यात आली आहे.