लोकमत न्यूज नेटवर्कनामपूर : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या आजच्या दुसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांनी शेतमालचे प्रचंड नुकसान करून आपला रोष व्यक्त केला. नामपूरसह परिसरातील सर्व दुकाने दिवसभर बंद ठेवण्यात आली होती.शेतकरी संघटनेच्या विविध संघटनांनी दि. १ जून ते ७ जूनपर्यंत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या संपास शंभर टक्के शेतीवर आधारित असलेल्या नामपूर परिसरातून प्रतिसाद मिळत आहे. गत ४८ तासांपासून परिसरात दूध, भाजीपाला, भुसार ,कांदा फळफळावळ पिकांची खरेदी-विक्र ी बंद असून, या संपामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होताना दिसून येत आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस, शिवसेना, रिपाइं, संभाजी ब्रिगेड, स्वाभिमानी शेतकरी संघटना, मराठा क्र ांती संघटना आदींनी संपाला पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान, नामपूरमार्गे गुजरातकडे विक्र ीसाठी जाणारा आंब्याने भरलेला ट्रक शेतकऱ्यांनी अडवून ट्रकमधील सुमारे पाचशे किलोपेक्षा जास्त आंबे रस्त्यावर फेकून शासनाचा निषेध केला. तसेच गावातील किरकोळ दूध विक्रेते अनिल भावसार यांचे ५० लिटर दूध रस्त्यावर फेकून देण्यात आले. गावातील सर्व दूध संकलन केंद्रे बंद असल्यामुळे दुधाची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. भाजीपाला मिळत नसल्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांची चांदी झाली आहे. साठवून ठेवलेला माल ते चढ्या भावाने विकत आहेत. नामपूर बाजार समिती आवारात शुक्रवारी (दि.२) पुन्हा प्रमुख नेत्यांची बैठक झाली. येत्या सोमवारचा आठवडे बाजार बंद ठेवून दि. ७ जून रोजी मोटारसायकल रॅली काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस शेतकरी संघटनेचे नेते रामचंद्र पाटील, प्रवीण सावंत, खेमराज कोर, अशोक सावंत, शिवाजी सावंत, अशोक निकम, दीपक पगार, गुलाबराव कापडणीस, संभाजी सावंत, समीर सावंत, छोटू सावंत,भाऊसाहेब अहिरे, पप्पू बच्छाव, शशिकांत कोर, सचिन अहिरराव, अमोल पाटील, जितेंद्र सूर्यवंशी, महेश सावंत, कैलास चौधरी,शैलेश कापडणीस यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वाभिमानी संघटनेचे दीपक पगार यांनी प्रास्ताविक केले. भाऊसाहेब अहिरे यांनी संप यशस्वी करण्यासाठी संपात सहभागी झालेल्या सर्व व्यापारी, कामगार, नोकरदारांचे आभार मानले.
पाचशे किलो आंबे फेकले रस्त्यावर
By admin | Published: June 03, 2017 12:41 AM