लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आॅनलाइन बाजाराच्या एका वेबसाइटवरून विविध वस्तूंची खरेदी एका ग्राहकाला महाग पडली आहे. या खरेदीनंतर संबंधित ग्राहकाला सदर संकेतस्थळाच्या संदर्भ देत भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत भामट्याने त्यांना आमिष दाखवून तब्बल चार लाख ७४ हजार ३१५ रुपयांना गंडा घातला आहे. फसवणुकीच्या आधुनिक फंड्यामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नीलेश बालाजी मंडलिक यांनी ‘किथी’ नावाच्या संकेतस्थळावरून आॅनलाइन खरेदी केली होती. यामध्ये घड्याळ, गॉगल, टी-शर्ट आदि वस्तूंचा समावेश आहे. खरेदीचा व्यवहार पूर्ण होत नाही तोच त्यांना एका निनावी भ्रमणध्वनीवरून कॉल आला. त्या कॉलवरून संबंधिताने मंडलिक यांचा विश्वास संपादन करत त्यांना, तुमची अमेझ कार कॉन्टेस्टमध्ये निवड झाल्याचे सांगून काही रक्कम गुंतविण्यास सांगितले. त्यानंतर मंडलिक यांनी वेळोवेळी रक्कम जमा करत एकूण ४ लाख ७४ हजार ३१५ रुपयांची गुंतवणूक केली. रक्कम गुंतवूनदेखील कुठल्याही प्रकारची कार मिळाली नाही आणि संबंधित भामट्याने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ सायबर पोलीस ठाणे गाठले. वेबसाइटवरून आॅनलाइन खरेदीनंतर फसवणूक झाल्याची फिर्याद त्यांनी सायबर पोलिसांकडे केली आहे. यानुसार पोलिसांनी मोबाइल फोनचे सीडीआर, एसडीआर, आय.पी.अॅड्रेस व ई-मेलच्या आयपी अॅड्रेसद्वारे ट्रेस लावण्यास सुरुवात केली आहे. सायबर पोलीस स्वतंत्ररीत्या याचा तपास करत असून, संशयित भामट्याचा शोध घेतला जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पवार यांनी दिली आहे.
पावणे पाच लाखांना गंडा; आॅनलाइन खरेदी पडली महाग
By admin | Published: July 14, 2017 1:37 AM