दिंडोरी : तालुक्यातील चिंचखेड येथे वन खात्याच्या जमिनीवर पाईपलाईनसाठी खोदलेल्या चारीबाबत कारवाई करू नये यासाठी वनविभागाचे परिमंडळ अधिकारी व दोन वनरक्षक यांनी एक लाखाची लाच मागितली होती तडजोडीनंतर ५० हजारांची लाच मागणीप्रकरणी तिघांविरोधात वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिंचखेड येथील फिर्यादी यांचे शेत बहादूर शिवार येथे असून शेतीकरिता पाणी आणण्यासाठी शेतीलगत असलेल्या वनविभागाच्या जागेतून पाईपलाईनसाठी मजुरांमार्फत खोदकाम केले होते. सदर काम विनापरवानगी केले असल्याने कायदेशीर कारवाई करू नये यासाठी वन परिमंडळ अधिकारी अनिल चंद्रभान दळवी, वनरक्षक उस्मानगनी गनीमलंग सय्यद व सुरेखा अश्रूबा खजे यांनी एक लाखांची लाच मागितली होती.याबाबत तक्रारदार शेतकऱ्यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत विभागाने त्याची पडताळणी करत सदर तिघांनी तडजोडी अंती पंचासमक्ष ५० हजार रुपयांची मागणी केल्याचे निदर्शनास आले लाचलुचपत विभागाने तिघांनाही रंगेहाथ पकडत वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एसीबीचे पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर करत आहे.