नाशिक : ‘विद्यार्थीच जात आणि विद्यार्थीच धर्म’ अशा वातावरणात आयुष्याची शैक्षणिक सुरुवात केलेल्या शाळेची आजची आणि ५० वर्षांपूर्वीची स्थिती विचारापलीकडे असून ‘शाळा म्हणजे एक कुटुंब’ हे प्रत्यक्षात आणले त्या माजी विद्यार्थ्यांनी रविवारी (दि.१२) पुन्हा एकदा आपल्या शाळेत येऊन तेव्हाच्या जुन्या आठवणींच्या स्मृती जागवल्या.नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या पेठे विद्यालयातील १९६६ मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी शालांत माध्यमिक परीक्षा (त्यावेळची इयत्ता ११वी) दिली त्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवार कारंजा येथील पेठे विद्यालयात घेण्यात आला. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत भरविण्यात आलेल्या या अनुभवींच्या वर्गात स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने ६० माजी विद्यार्थी उपस्थित होते. प्रारंभी १९६६ सालातील दिवंगत माजी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर शाळेची घंटा वाजवून प्रार्थना घेण्यात आली. त्यानंतर या ज्येष्ठ माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांचा परिचय करून दिला. १९६६ सालातील आणि आत्ताची पेठे विद्यालय, तेव्हाचे विद्यार्थी, शिक्षक गॅदरिंग, परीक्षा, जादा वर्ग आदि जुन्या-नव्या स्मृतींना गप्पा-टप्पांमधून उजाळा दिला.त्यावेळी शिकविणाऱ्यांपैकी वि. प्र. गुप्ते, भालचंद्र माटे, विश्वनाथ साठे, वसंत सहस्त्रबुद्धे, बाळासाहेब सराफ या शिक्षकांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर या शिक्षकांनी आपल्या मनोगतात, विद्यार्थी हेच जात आणि धर्म होता. विद्यार्थी अधिक समजदार होते. त्यांना प्रत्येक शिक्षकाप्रती आदरपूर्वक भीती आणि तितकेच प्रेम होते. शिक्षकांनाही विद्यार्थ्यांबद्दल जिव्हाळा, आपुलकी असायची. आताची परिस्थिती फारच वेगळी असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पन्नास वर्षांनी त्या विद्यार्थ्यांचा पुन्हा भरला वर्ग
By admin | Published: February 12, 2017 10:48 PM