ज्येष्ठ कवी, गीतकार विनायक पाठारे यांच्यावर सोमवारी (दि. २७) दुपारी अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी अग्निडाग झाल्यानंतर श्रद्धांजली वाहण्यासाठी अनिल गांगुर्डे आणि प्रशांत गांगुर्डे यासह इतर साथीदार उभे राहिले. यावेळी संशयित माजी महापौर अशोक दिवे नगरसेवक राहुल दिवे, प्रशांत दिवे, जयेश सोनवणे, अनिकेत ऊर्फ पप्पू गांगुर्डे आदींनी मिळून गांगुर्डे यांना तेथून हाकलून लावल्याचे फिर्यादी विक्रांत गांगुर्डे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
श्रद्धांजली सभेतून जाण्यास नकार दिला असता संशयितांनी तेथील अंत्यविधीसाठी ठेवलेल्या लाकडांनी हल्ला चढविला असता आम्ही तेथून जीव वाचविण्यासाठी पळालो, असे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, मारहाणीत गांगुर्डे पिता-पुत्र जखमी झाले आहेत. संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जयेेश लक्ष्मण सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित अनिल गांगुर्डे, प्रशांत गांगुर्डे, विक्रांत गांगुर्डे, सविता गांगुर्डे (रा. समतानगर), शशी उन्हवणे, गणेश उन्हवणे (रा. जेलरोड) यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या दोन्ही फिर्यादीवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
वाढदिवसाच्या फलकावरून वादाची ठिणगी
विक्रांत गांगुर्डे यांनी वाढदिवसाचे फलक मागील सप्टेंबर महिन्यात समतानगर, आगरटाकळी परिसरात लावले होते. हे फलक संशयित दिवे यांच्या घरातील महिलांनी फाडल्याचा आरोप गांगुर्डे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात केला आहे. त्या वादाची कुरापत काढत संशयितांकडून अमरधाममध्ये हल्ला करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
गांगुर्डे, उन्हवणे यांच्याविरुद्ध यापूर्वीही गुन्हे
फिर्यादी अनिल गांगुर्डे यांच्याविरुद्ध यापूर्वी उपनगर, नाशिकरोड पोलीस ठाण्यात तर सविता गांगुर्डे यांच्याविरुद्धही नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याचप्रमाणे शशी उन्हवणे, गणेश उन्हवणे यांच्याविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ल्यासह विविध कलमांन्वये गुन्हे दाखल आहेत.