नाशिक : संपूर्ण भारतभर पसरलेल्या भटक्या विमुक्तांच्या माथी युगानुयुगे केवळ उपेक्षा आली आहे. प्रतिष्ठित समाजाच्या तथाकथित ठेकेदारांनी भटक्या विमुक्त जातीजमातीच्या लक्षावधी लोकांवर बहिष्कार टाकून मोठ्या प्रमाणात अन्याय केला आहे. अशा समाजातील शिक्षण घेऊन सावरू पाहणारी नवी पिढी आता साहित्याच्या माध्यमातून आपल्या वेदना व्यक्त करू लागली आहे. हे साहित्य प्रखर वास्तववादी आणि ज्वलंत असल्यामुळे वाचकांपर्यंत पोहोचणे गरजेचे असून, अशा साहित्याच्या माध्यमातून समाजाने आपल्या हक्कांसाठी लढा उभारला तरच न्याय मिळेल, असे प्र्रतिपादन भटक्या विमुक्तांचे संमेलन अध्यक्ष बालसाहित्यिक सुभाषचंद्र वैष्णव यांनी केले.क्रांतिवीर वसंतराव नाईक अभियांत्रिकी विद्यालयातील क्रांतिवर वसंतराव नाईक साहित्यनगरीत महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती-जमाती शिक्षण, विकास व संशोधन संस्था आणि साहित्य व संस्कृ ती मंडळ महाराष्ट्र शासन यांच्या वतीने दहाव्या राज्यस्तरीय भटक्या विमुक्त साहित्य संमेलनाचे अध्यक्षीय भाषण करताना वैष्णव बोलत होते. व्यासपीठावर प्रा. सुनीता पवार, संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ राठोड, स्वागताध्यक्ष कोंडाजी आव्हाड, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, डी. के. गोसावी प्रा. वा. ना. आंधळे, प्रा. अशोक पवार आदि उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन झाले. उद्घाटक प्रा. सुनीता पवार यांनी पुरोगामीत्वाचे पांघरून समाजहिताचे ढोंग करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला.
हक्कांसाठी लढूनच न्याय मिळेल
By admin | Published: January 15, 2017 1:23 AM