मालेगाव : मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल झाल्यांनतर आज एका उमेदवाराने आपली उमेदवारी मागे घेतल्याने प्रत्यक्ष रिंगणात १३ उमेदवार उरले आहेत. गेल्या २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मालेगाव मध्य मतदारसंघातून १२ उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. यंदा त्यात आणखी एकाची भर पडली असून, आता १३ उमेदवार निवडणूक रिंगणात उरल्याने निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण होणार आहे.यंदा सुमारे १९ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज नेले खरे; परंतु त्यातील पाच उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याने १४ उमेदवार कालपर्यंत रिंगणात होते, त्यापैकी आज खालिद परवेज मोहंमद युनुस यांनी उमेदवारी मागे घेतल्याने आता खऱ्या अर्थाने निवडणूक रिंगणात १३ उमेदवार उरले आहेत. २०१४मध्ये ५ अपक्ष उमेदवारांची अधिकृत पक्षांच्या उमेदवारांना डोकेदुखी ठरली होती, तर यावेळी ८ अपक्ष रिंगणात आहेत.२०१४च्या विधानसभा निवडणुकीत मालेगाव मध्य मतदारसंघात आघाडी नसल्याने कॉँग्रेसतर्फे आसिफ शेख आणि राष्टÑवादीतर्फे मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल कासमी यांच्यात काट्याची लढत होऊन कॉँग्रेसचे आसिफ शेख विजयी झाले होते. यावेळी २०१९च्या निवडणुकीत मात्र कॉँग्रेस - राष्टÑवादी यांची आघाडी न झाल्याने राष्टÑवादीचे मौलाना मुफ्ती मोहमद इस्माईल यांनी राष्टÑवादीला सोडचिठ्ठी देऊन एमआयएममध्ये प्रवेश करीत एमआयएमची उमेदवारी मिळवली असून, आता पुन्हा एकदा कॉँग्रेसचे विद्यमान आमदार आसिफ शेख आणि एमआयएमचे उमेदवार मौलाना मुख्ती मोहंमद इस्माईल कासमी यांच्यातच दुरंगी लढत अपेक्षित आहे.रिंगणातील उमेदवार...आसिफ शेख (काँग्रेस), मोहंमद इस्माईल अब्दुल खालिक (एमआयएम), रऊफखान कादिरखान (रिपाइं ए), दीपाली विवेक वारूळे (भाजप), रिंगणातील अपक्ष उमेदवार - बहबुद अब्दुल खालिक, मोहंमद इमाईल जुम्मन, अ. हमीद शेख हबीब, सय्यद सलीम सय्यद अलीम, अब्दूल वाहिद मोहंमद शरीफ, इरफान मो. इसहाक, अब्दूल खालिक गुलाम मोहंमद, मोहंमद रिजवान मोहंमद अकबर, महेकौसर लुकमान मोहंमद.२०१४ मध्ये होते १२ उमेदवार । यंदा आहेत एकूण १३ उमेदवार
कॉँग्रेस-एमआयएममध्ये लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 1:42 AM