बाग-ए-महाफुसमध्ये घरफोडी
मालेगाव : शहरातील बडी मालेगाव हायस्कूलसमोर प्लॉट नं. ७७, स. नं. १६५ बाग - ए - महाफुस येथे गुरुवारी घरफोडी झाली असून, या प्रकरणी जफर शेख (पूर्ण नाव माहीत नाही) रा. रौनकाबाद याच्या विरोधात आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अब्दुल रहेमान मोहंमद ताहीर खान (रा. बाग - ए - महेफुज) यांनी फिर्याद दिली. आरोपीने दीड हजार रुपये किमतीचा भ्रमणध्वनी संच, साडेतीन हजार रुपये किमतीचे घड्याळ घरात घुसून चोरून नेले. अधिक तपास पोलीस नाईक पाडवी करीत आहेत.
दरेगाव शिवारात अपघात; एक ठार
मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर दरेगाव शिवारात गेल्या शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दोन दुचाकींची धडक होऊन झालेल्या अपघातात जाहीद अहमद एजाज अहमद (१७) रा. अहमदपुरा हा गंभीर जखमी होऊन ठार झाला, तर फैजान अहमद मोहंमद अलताफ हा जखमी झाला. या प्रकरणी पवारवाडी पोलिसात अजीजुर्रहेमान अहेमद रजा रा.अहमदपुरा, एकबाल चौक यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी क्रमांक एमएच ४१ क्यु ९३८० या दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. आरोपीने मुंबई-आग्रा महामार्गाने धुळ्याकडून नाशिककडे जात असताना, भरधाव वेगात वाहन चालवून समोरून येणाऱ्या दुचाकी क्रमांक एमएच ४१ वाय १४७१ ला धडक दिली. अपघाताची खबर न देता आरोपी पळून गेला, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास हवालदार मोरे करीत आहेत.
कलेक्टरपट्टा भागात हाणामारी
मालेगाव : शहरातील कलेक्टरपट्टा भागात कैलासबाबा मंदिराजवळ दुधाच्या रतिबाचे पैसे घेण्यावरून वाद झाल्याने हाणामारी झाली. या प्रकरणी छावणी पोलिसात नरेंद्र उदयसिंग परदेशी (रा. साईबाबा कॉलनी, नानावटी पेट्रोल पंपामागे) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी मच्छिंद्र गोविंद शिर्के, त्याचा भाऊ व वडील गोविंद शिर्के (सर्व रा.कैलासबाबा मंदिर कलेक्टरपट्टा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मच्छिंद्र शिर्के यांच्या घरी दुधाच्या रतिबाचे पैसे घेण्यासाठी फिर्यादी गेला असता, आरोपीच्या वडिलांशी वाद होऊन फिर्यादीस शिवीगाळ करण्यात आली. यावेळी शिर्के व त्याच्या भावाने फिर्यादीस मारहाण केली. कपील परदेशी हे भांडण सोडविण्यास गेले असता, त्यांनाही मारहाण, दमदाटी, शिवीगाळ करण्यात आली. अधिक तपास पोलीस नाईक गवळी करीत आहेत.
हृदयविकाराच्या झटक्याने एकाचा मृत्यू
मालेगाव : शहरातील जाजूवाडी भायगाव शिवारातील जयवंत खंडू गावित (५४) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पोलीस नाईक पवार यांनी शहर पोलिसात खबर दिली. गेल्या शनिवारी जयवंत गावित यांची प्रकृती बिघडल्याने, त्यांना सामान्य रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अधिक तपास जमादार पवार करीत आहेत.