-----
व्यापाऱ्याची फसवणूक करणाऱ्या चौघा जणांविरुद्ध गुन्हा
मालेगाव : टेक्सटाईल मशीन खरेदी व्यवहारात २७ लाख ८ हजार रुपयांची फसवणूक व पैशांचा अपहार केल्याप्रकरणी चौघा जणांविरुद्ध किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तमिल सेल्वन पेरीया स्वामी, रा. देवांगपूर, ता. त्रिचेनगोडे (तामिळनाडू) या टेक्सटाईल मॅन्युफॅक्चरिंग व ट्रेडिंग कंपनीच्या व्यापाऱ्याने फिर्याद दिली आहे. सिंधिया मदलियार उरकुट्टी, रा. भिवंडी व अन्य एक, रा. कडपट्टी, जि. नामक्कल, एक कल्याण व एक मालेगावच्या (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांनी फिर्यादी तमिलकडून रोख रक्कम व ऑनलाइन ट्रान्झेक्शनद्वारे २७ लाख ८ हजार रुपये टेक्सटाइल मशीन न देता फसवणूक करून पैशांचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाळ हे करीत आहेत.
----
लोखंडी पाइपाने मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा
मालेगाव : शहरातील सलामचाचा रस्त्यावर मागील भांडणाची कुरापत काढून तरुणाला लोखंडी पाइपाने गंभीर मारहाण केल्याप्रकरणी दोघा जणांविरुद्ध आयेशानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी इफ्तेखार अहमद नफीस अहमद, रा. अमिनाबाद या तरुणाने फिर्याद दिली आहे. अज्जू व अनस (दोघांचे पूर्ण नाव माहीत नाही) यांनी गंभीर मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार बी. व्ही. पाटील हे करीत आहेत.
-----
दाभाडी शिवारातून दोन दुचाकी लंपास
मालेगाव : तालुक्यातील दाभाडी शिवारातून चोरट्याने २५ हजार रुपये किमतीची दुचाकी (क्र. एमएच ४१ बीए ६०६३) चोरून नेली आहे. याप्रकरणी सतीश बारकू निकम यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या मालकीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. दुसरी घटना दाभाडी शिवारात घडली. दाैलती शाळेमागून जगदीश गोरख बोरसे यांच्या मालकीची २५ हजार रुपये किमतीची दुचाकी (क्र.एमएच १८ एएल ४१५३) अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील व बस्ते हे करीत आहेत.
-----
रमजानपुरा भागातून दुचाकी लंपास
मालेगाव : शहरातील मेमन कॉलनीतून अज्ञात चोरट्याने २० हजार रुपये किमतीची दुचाकी (क्र. एमएच ४१ एई ७८८१) चोरून नेली. याप्रकरणी समीर कलीम मन्सुरी यांनी रमजानपुरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रोही करीत आहेत.
----
कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
मालेगाव : झोडगे ते टोकडे रस्त्यावरील जळकू शिवारात कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार मनोज बाबूराव डिंगर (३४, रा. टोकडे) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी निलेश कैलास झिंजर यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. झोडग्याकडून टोकडेकडे जाणाऱ्या भरधाव कारने (क्र. एमएच ०३ बीई ४७५८) समोरून येणाऱ्या दुचाकीला (क्र. एमएच २० ईडी ६८०२) धडक दिली. यात मनोज डिंगर हे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पुढील तपास पाेलीस हवालदार बच्छाव करीत आहेत.