नितीन बोरसे सटाणासर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या बागलाण तालुक्यातील जायखेडा गटात दिग्गजांच्या होम ग्राउण्डवर वर्चस्वासाठी लढाई रंगणार आहे.जायखेडा गट म्हणजे माजी आमदार दिलीप व उमाजी बोरसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे, भाजपा तालुकाध्यक्ष संजय भामरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्रप्रमुख दीपक पगार यांचे होम ग्राउण्ड असल्यामुळे बागलाणचे राजकीय केंद्रबिंदू म्हणून मानला जातो. या दिग्गजांचा प्रभाव असल्यामुळे या गटात समाविष्ट असलेल्या आसखेडा गणाने तब्बल पाच वेळा सभापतिपदाचा बहुमान मिळून दिला आहे. हा गण यंदा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाल्यामुळे सर्वच पक्षांमध्ये उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे साहजिकच निवडणूकदेखील चुरशी होणार असली तरी भाजपा व राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्येच सामना रंगणार असल्याचे चित्र आहे.आसखेडा गणाचे प्रतिनिधित्व सध्या भाजपाच्या गीता विशाल सोनवणे या करत आहेत. यापूर्वी सामान्य कुटुंबातील पिंगळवाडे येथील युवा शेतकरी रवींद्र भामरे यांनी नेतृत्व केले आहे. गीता सोनवणे निवडून आल्यानंतर पहिले दोन वर्ष बागलाण पंचायत समितीच्या सभापतिपदाचा मान मिळाला होता. या गणावर भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाचा प्रभाव राहिला असला तरी सन १९९१ व १९९६-९७ मध्ये शिखर बँकेचे माजी अध्यक्ष कै. जयवंतराव सावंत, सोमनाथ ब्राह्मणकर, माजी आमदार दिलीप बोरसे यांचा प्रभाव असल्यामुळे त्यांनी निर्माण केलेल्या विकास आघाडीचे वर्चस्व राहिले आहे. शशिकांत देवरे, मंजुळाबाई कापडणीस, चिला निकम, प्रा.रामदास खैरनार यांनी अपक्ष बाजी मारली होती. या गणाचा या पाच वर्षाच्या काळात मात्र जिल्हा परिषद सदस्य यतीन पगार यांनी पंचायत समिती सदस्या गीता सोनवणे यांना सोबत घेऊन पाणीप्रश्न, दळणवळण, सिंचन, आरोग्य, वीज आदि मूलभूत प्रश्न सोडविण्याबरोबरच गाव तेथे बहुउद्देशीय केंद्र उभारून गणाचा चौफेर विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या निवडणुकीत आसखेडा गण अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव होता. आता हा गण ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचा दारूण पराभव केल्यामुळे या निवडणुकीत पराभवाचा बदला काढण्यासाठी राष्ट्रवादी जोर बैठका काढत आहे. या निवडणुकीत इच्छुकांची गर्दी असली तरी भाजपा व राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे तिकिटासाठी इच्छुकांची रांग मात्र मोठी आहे. उभय पक्षाकडे उमेदवारीसाठी चुरस आहे. एकंदरीत दिग्गज नेत्यांच्या होम ग्राउण्डवर रंगणाऱ्या या वर्चस्वाच्या लढाईत कोण बाजी मारते, याकडे संपूर्ण बागलाणचे लक्ष लागून आहे.
वर्चस्वासाठी लढत
By admin | Published: February 01, 2017 10:17 PM