मनमाड:- धुळे येथील डेरीवर दरोडा टाकून फरार झालेल्या आरोपींमध्ये आपापसात झालेल्या वादातून गोळीबार झाल्याची घटना मनमाड शहरातील भगतिसंग मैदानात घडली. भल्या पहाटे तीन वाजता घडलेल्या या थरार नाट्यामुळे खळबळ उडाली आहे. धुळे येथे एक डेअरीवर दरोडा टाकून फरार झालेल्या मनमाड येथील रहिवासी असलेल्या दरोडेखोरांमध्ये चोरीचा मुद्देमाल वाटणी वरून आपापसात वाद झाला. त्यांच्यातील वाद विकोपाला गेल्याने सागर मरसाळे,गणेश मरसाळे यांनी त्यांचा जोडीदार गुरू भालेराव याच्यावर गोळी झाडली. दरम्यान या दरोड्यातील आरोपी मनमाड येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने धुळे येथील पोलीस या आरोपींच्या मागावर होते.गोळीबाराची घटना घडल्यानंतर लगेचच धुळे पोलिसांनी जखमी भालेराव व सागरला ताब्यात घेतले तर एक आरोपी फरार झाला आहे.पोलीस दोन्ही आरोपींना धुळे येथे घेऊन गेले आहे.गोळीबाराच्या घटनेत जखमी झालेल्या आरोपींवर धुळे येथे उपचार सुरू असल्याचे समजते.जखमी आरोपीच्या फिर्यादीवरून मनमाड शहर पोलिसात सायंकाळ पर्यंत गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
धुळे दरोड्यातील आरोपींमध्ये वाद, मनमाडला गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 12:39 PM