नाशिक : महापालिकेने अपंगांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू केले असून, पाच दिवसांत ५ हजार १२६ अपंगांची नोंद झाली आहे. महापालिकेने सन-२०१३ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात ५१८ अपंग आढळून आले होते. आता मनपाच्या प्राथमिक सर्वेक्षणात पाच वर्षांत अपंगांच्या संख्येत दसपटीने वाढ झालेली आहे. अजून सर्वेक्षणाचे काम सुरू असून, संख्येत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.अपंग पुनर्वसन कायद्याच्या अंमलबजावणीबाबत विदर्भातील आमदार बच्चू कडू यांनी महापालिकेत येऊन प्रशासनाला जाब विचारल्यानंतर मनपाची यंत्रणा हलली आणि एक कृती कार्यक्रमाची आखणी करण्यात आली. त्यात प्राधान्याने शहरातील अपंग बांधवांचा तातडीने सर्व्हे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, दि. ८ आॅगस्टपासून वैद्यकीय विभागाकडून सुमारे ६४५ कर्मचाºयांमार्फत शहरात विभागनिहाय माहिती संकलनाचे काम सुरू करण्यात आले आहे. या कर्मचाºयांमध्ये १४६ आशा कर्मचारी, ३० सुपरवायझर, २४ एएनएम आणि स्वयंसेवकांचा समावेश आहे. महापालिकेमार्फत सुरू असलेल्या सर्वेक्षणात पाच दिवसांत कर्मचाºयांनी चार लाख ३८ हजार ९८९ घरांना भेटी दिल्या असता ५,१२६ विविध प्रकारचे अपंगत्व असलेल्या व्यक्ती आढळून आल्या आहेत. कर्मचाºयांमार्फत अपंग असलेल्या व्यक्तींची माहिती संकलित केली जात असून, त्यांची संगणकीय नोंद ठेवण्यासाठी दहा डाटा आॅपरेटरची वैद्यकीय विभागात नियुक्ती करण्यात आलेली आहे. येत्या २० आॅगस्टपर्यंत सदर सर्वेक्षण चालू राहणार आहे. ज्या घरात अपंग व्यक्ती आढळून आली तेथे एच नावाचे मार्किंग केले जात आहे. जेथे अपंग बांधव नाही तेथे ‘के’ नावाचे मार्किंग, तर ज्याठिकाणी घर बंद असेल तेथे ‘एक्स’ नावाचे मार्किंग केले जात आहे. बंद घर असलेल्या पुन्हा एकदा भेट दिली जाणार आहे. अपंग बांधवांची वर्गवारी करून नंतर शहरात विभागनिहाय वैद्यकीय तपासणी शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. त्यामध्ये ज्यांच्याकडे अपंग असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकाच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र नसेल त्यांची नोंदणी जिल्हा रुग्णालयाकडून करून घेतली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे यांनी दिली.
अपंगांच्या संख्येत दसपटीने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 7:02 PM