मुकबधिर असोसिएशन सर्वसाधारण सभा
नाशिक : नाशिक जिल्हा मुकबधिर असोसिएशनची सर्वसाधारण सभा माई लेले श्रवण विकास शाळेच्या सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी गोपाळ बिरारे होते. सभेत मागील वर्षीचा ताळेबंद सादर करण्यात आला. त्यानुसार सर्व विषय मंजूर करण्यात आले. संस्थेचे सल्लागार मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवड करण्यात आली. पदाधिकारी मंडळाची निवड बिनविरोध करण्यात आली. अध्यक्षपदी सतीश गायकवाड, उपाध्यक्ष गोपाळ बिरारे, सरचिटणीस कशिश छाब्रा, सहचिटणीस जयसिंग काळे, खजिनदार विनय सानप, सदस्य कुतूहिन कोकणी, सदस्य जयेश लव्हारकर, सदस्य पूजा सानप, अनिता गायकवाड यांची निवड करण्यात आली.
नायलॉन मांजा रस्त्यावर पडून
नाशिक : इंदिरानगर परिरसरातील अनेक रस्त्यांवर नायलॉन मांजा पडून असल्याचे दिवसभरात दिसून आले. काही ठिकाणी रस्ता दुभाजकात असलेल्या झाडांवर मांजा आढळून आला तर उद्याने तसेच अनेक ठिकाणी रस्त्यांवर मांजा लटकत असल्याचे दिसून आले. काही सुज्ञ नागरिकांनी स्वत:हून मांजा बाजूला केला तर अनेकांनी दुर्लक्ष केले.
अवजड वाहतूक ठरतेय धोक्याची
नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गाकडे जाणारी वाहतूक वडाळा गावातून जात असल्याने येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाट लोकवस्ती असून या रस्त्यावरून होणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक धोकादायक ठरू शकते. याच मार्गावर पुढे टाकळी गावातून मोठमोठे ट्रक्स, कंटेनर्सची वाहतूक होत आहे.
द्वारका चौकातील पोलिसांचे दुर्लक्ष
नाशिक : शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी द्वारका चौकात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. मात्र चौकातील वाहतूक पोलिसांचे वाहतुकीवर नियंत्रण नसल्याने चौकात वाहतूक कोंडी होत असते. अनेक वाहनधारक सिग्नल नियमांकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे चौकात वारंवार वाहतूक कोंडीचा प्रश्न उभा राहतो.