घोटी : शहरातील मविप्रच्या जनता विद्यालयात आठवीत शिक्षण घेणाऱ्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीची शिकविण्याच्या बहाण्याने छेडछाड करून विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकावर अखेर आज घोटी पोलीस ठाण्यात विनयभंग, बाल लैंगिक अत्याचार कायदा व अॅट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत काल शनिवारी अत्याचारित मुलीच्या पालकांनी घोटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, घोटी येथील जनता विद्यालयात हिंदी विषय शिकविणारे शिक्षक कैलास सानप हे वर्गात चित्र काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलींशी सलगी करून छेडछाड करीत असल्याचा प्रकार गेल्या काही दिवसांपासून होत होता. मात्र दहशतीपोटी अनेक मुली हा प्रकार निमूटपणे सहन करीत होत्या.यानुसार आज अत्याचारित मुलीच्या पालकांनी घोटी पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षक कैलास रामचंद्र सानप याच्याविरुद्ध फिर्याद दिली. या फिर्यादीवरून सानप याच्याविरुद्ध विनयभंग, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व अॅट्रासिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित शिक्षक फरार झाला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, उपनिरीक्षक कमलेश बच्छाव, संदीप झालटे आदि करीत आहेत. (वार्ताहर)
विनयभंगाचा गुन्हा दाखल
By admin | Published: August 21, 2016 10:33 PM