देवळा : बनावट दस्तऐवज तयार करून मेशी येथील जमीन खरेदीप्रकरणी जिल्हा मुद्रांक अधिकारी कैलास दवंगे यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुसंगाने दुय्यम निबंधक देवळा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवळा पोलीस ठाण्यात बापू रामचंद्र वाघ, मुद्रांक विक्रेता चंद्रकांत उर्फ गोटू देवाजी वाघ व इतर साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देवळा येथील अभिलेख कक्षातून मुद्रांक विक्रेता चंद्रकांत वाघ याने दुय्यम निबंधक कार्यालय येथून अधिकारी व कर्मचारी यांच्याशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन विश्वास संपादन केला. त्यांची नजर चुकवून दस्त क्र १७८७/२०१२ ची झेरॉक्स कॉपी कार्यालयाचे अभिलेख कक्षातून मालमत्ता हस्तांतरित करता यावी या उद्देशाने काढून घेतली. त्यातील मजकुराशी छेडछाड करून बनावट दस्तऐवज तयार केला. नंतर तो दुय्यम निबंधक कार्यालय देवळा येथील अभिलेख कक्षात परत ठेवून दिला. यानंतर बापू रामचंद्र वाघ यांना अर्ज लिहून देऊन सदर बनावट दस्ताची साक्षांकित प्रतीत मागणी केली. सदरचा दस्त खोटा आहे हे माहिती असतानाही तो खरा आहे असे भासवून संगनमताने मेशी शिवारातील मिळकत नं. ४००/१ (क्षेत्र - ३ हेक्टर ७०.आर ) फेरफार नोंदी करून घेऊन बापू वाघ यांच्या नावे करून शासनाची तसेच तक्रारदार भास्कर धर्मा निकम (रा. तिसगाव ता देवळा ) यांची संगनमत करून स्वत:चे फायद्यासाठी फसवणूक केली. दुय्यम निबंधक माधव यशवंत महाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बापू रामचंद्र वाघ ( रा. झाडी, ता. मालेगाव ) मुद्रांक विक्रेता चंद्रकांत उर्फ गोटू देवाजी वाघ ( रा. गिरणारे, ता. देवळा ) व इतर साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पो. नि. सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर व सहकारी करीत आहेत.