नाशिक : फळांचा राजा अर्थात आंब्यांच्या विविध प्रकारांचे नाशकात आगमन झाले असून, यंदा मुबलक प्रमाणात पीक आल्याने नाशिककरांना मनसोक्त आंबे चाखण्याची संधी मिळणार आहे. सध्या शहरात देवगड, बंगळुरू, रत्नागिरी येथील लालबाग, पायरी, केशर, हापूस आदि प्रकारचे आंबे दाखल झाले आहेत. रविवार कारंजा, कॉलेजरोड, अशोकस्तंभ, सातपूर, सिडको आदि सर्वच भागात आंब्यांची दुकाने ग्राहकांना आकर्षित करत आहेत. अक्षय तृतीयेनंतर आंब्यांच्या आवकेत आणखी वाढ होणार असल्याची माहिती फळविक्रेत्यांनी दिली. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा आंब्यांचा मोसम एक महिना आधी आल्याने आंबे बाजारात लवकर दाखल झाले आहेत. द्राक्षाचा मोसम संपत आला असून, ग्राहकांनी आता इतर फळांबरोबर आंब्याकडे आपला मोर्चा वळवल्याचे दिसून येत आहे. कोकण पर्यटन विकास महामंडळातर्फे लवकरच आंबा महोत्सव भरविण्यात येणार असून, नाशिककरांना त्यातूनही विश्वासार्ह व अस्सल आंबे खाण्याची संधी मिळणार आहे. यंदा भरपूर पाऊसपाणी झाल्याने आंब्यांचे उत्पादन वाढले असून, वैविध्यपूर्ण व चांगल्या दर्जाचे आंबे खाण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. अस्सल व वेळेत पिकलेल्या आंब्यांचीच खरेदी आरोग्यदायी असते. त्यामुळे कार्बाईडद्वारे पिकवलेल्या आंब्यांपासून मात्र सावध राहण्याची खबरदारी ग्राहकांना घ्यावी लागणार आहे. (प्रतिनिधी)
फळांचा राजा दाखल
By admin | Published: April 12, 2017 10:49 PM