नाशिक : जिल्ह्यात कुपोषण रोखण्यासाठी रिक्त असलेली बालविकास प्रकल्प अधिकारी व अंगणवाडी सेविकांची पदे तातडीने भरण्यात यावीत, असा ठराव जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभेत घेण्यात आला़महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्ष सुनीता अहेर यांच्या अध्यक्षतेखाली आज समितीची सभा झाली़ दिवंगत केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे व पंचायत समितीचे माजी सभापती केरूनाना चुंभळे यांना श्रद्धांजली वाहून सभेचे कामकाज सुरू झाले़ यावेळी जिल्ह्णातील कुपोषणाचा आढावा घेण्यात आला़ यामध्ये आतापर्यंत झालेल्या कुपोषण व बळींबाबत चिंता व्यक्त करण्यात आली,तर आगामी काळात कुपोषण टाळण्यासाठी बालविकास अधिकाऱ्यांची ११ रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी, असा ठराव करण्यात आला़ अंगणवाडी सेविकांची २९६ रिक्त पदे भरण्यासाठी अंगणवाडी सेविका भरतीसाठी दिलेली स्थगिती उठविण्याचा ठराव करण्यात आला़ जिल्हा परिषदेच्या सेस व शासकीय प्राप्त अनुदानातून महिलांसाठी तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण, मुलींना संगणक प्रशिक्षण एमएससीआयटी कोर्स, कराटे प्रशिक्षण तसेच कुपोषण कमी करण्यासाठी अतिरिक्त आहार व बालविकासाच्या योजनांना मान्यता देण्यात आली़ व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षणांतर्गत ब्यूटी पार्लर व रेग्झीन बॅग तयार करण्याचे प्रशिक्षण वर्ग घेण्यात यावेत, अशी सूचना सदस्य सोनाली पवार यांनी केली़याप्रसंगी समिती सदस्य कलावती चव्हाण, शीला गवारे, सुरेखा गोधडे, सुरेखा जिरे, अलका साळुंके, सोनाली पवार, मंदाकिनी भोये, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उद्धव खंदारे व आरोग्य विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते़