सिन्नर : दरवर्षी आॅगस्ट महिन्यात ओसंडून वाहणारे कडवा धरण यंदा सुमारे २० दिवस उशिराने भरले आहे. सिन्नर तालुक्यात पाहिजे त्या प्रमाणात पाऊस नसल्याने तसेच तालुक्यातील बंधारे व धरणांनी तळ गाठलेला असल्याने खरिपासाठी कडवा धरणातून आवर्तन सोडण्याची आस सिन्नरच्या पूर्व भागाला लागली आहे. इगतपुरी तालुका हा पावसाचे माहेरघर असला तरी यंदा या भागातही पाहिजे. त्या प्रमाणात पाऊस नव्हता. यंदा उशिरा का होईना कडवा धरणाचा सांडवा काल मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ओसंडून वाहू लागला. सध्या धरणातून १५० क्युसेक्स विसर्ग सुरु असल्याची माहिती कडवा प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता मिलिंद बागुल यांनी दिली.
या धरणाची एकूण साठवणक्षमता १६८८ दलघफू एवढी आहे. इगतपुरीसह नाशिक व सिन्नर, निफाड आदी तालुक्यातील लाभक्षेत्राला या धरणावरील कालव्याचा फायदा होतो. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे धरणाच्या पातळीकडे कायमच लक्ष असते. सिन्नर तालुक्यात यंदा पावसाने पाठ फिरवली आहे. पावसाळा संपत आला तरी सिन्नर तालुक्यात पुरेसा पाऊस नाही. परिणामी धरणे, नदी, नाले कोरडेठाक आहेत. त्यामुळे खरीप हंगामातील पिके आतापर्यंत कशीबशी वाढली असली तरी पाऊस नसल्याने त्यांचे भवितव्य अधांतरी आहे.
-------------------------
कडवावर शेती अवलंबून
कडवा धरणाच्या कालव्यावर सिन्नरच्या पूर्व भागातील बरीचशी शेती अवलंबून आहे. त्यामुळे धरण भरले की, कालव्याद्वारे खरीप हंगामासाठी आवर्तन सोडण्याची मागणी सुरु होते. गेल्या महिन्यातच आमदार माणिकराव कोकाटे व माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी कालव्याद्वारे आवर्तन सोडण्याची मागणी केली आहे. मात्र अद्याप पाणी सोडण्यात आले नव्हते. १५ ते २० दिवस उशिराने कडवा धरण भरले आहे. सांडवा ओसंडून वाहू लागला आहे. पावसाचा जोर वाढल्यास कालव्याद्वारे सिन्नरच्या पूर्व भागातील खरीप हंगामासाठी आवर्तन सोडण्यात येईल. तथापि, आता खरीपाच्या पिकांना आवर्तनाची गरज असल्याने धरण भरल्याने आता तरी आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
-------------------
फोटो ओळी- सिन्नरच्या पूर्व भागाला वरदान ठरणारे कडवा धरण भरले असून, त्यातून थोड्याफार प्रमाणात विसर्ग सोडण्यात आले. (०८ कडवा डॅम)
080921\08nsk_14_08092021_13.jpg
०८ कडवा डॅम