नाशिक : कोरोनाची परिस्थिती नॉर्मल झाल्यानंतर नाशिकमध्ये प्रथमच कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि दादासाहेब फाळके फिल्म सोसायटी यांच्यावतीने शनिवारी (२६ डिसेंबर) सुप्रसिद्ध ‘ नॉट विदाऊट माय डॉटर’ या चित्रपटाच्या सादरीकरणाने प्रेक्षकांना अनोखा आनंद दिला.
कुसुमाग्रज स्मारकाच्या विशाखा सभागृहात ‘नॉट विदाऊट माय डॉटर’ हा इंग्रजी चित्रपट दाखविण्यात आला. १९८४ सालच्या इराणमधील आयातुल्ला खोमेंनी यांची राजवटीतील कट्टरता. पास्टर्स, घोषणाबाजी आणि कट्टर धर्मांधतेने व्यापलेल्या वातावरणातील एका कुटुंबाची कथा त्यात रंगवण्यात आली होती. अमेरिकन पत्नी बेट्टी (सॅली फील्ड) आणि मुलगी महतोब(शैला रोझेंथाल) यांच्यासह अमेरिकेत वास्तव्य करणारे सय्यद बोझोर्ग "मूडी" महमूदी एका इस्पितळात प्रथितयश डॉक्टर आहेत. पत्नी व मुलीसह ते अत्यंत अलीशान व निसर्गरम्य घरात रहात आहेत. सर्व दिशांनी त्यांच्या वाट्यास सुखे आलेली असतात; मात्र त्यांच्या इराणच्या भौगोलिक पार्श्वभूमीमुळे त्यांच्या बरोबरीच्या डॉक्टर्सकडून त्यांची नेहमीच हेटाळणी होत आहे. त्यांच्या मुलीलासुद्धा शाळेत अशीच थट्टा, अपमान सहन करावा लागत आहे. बेट्टी महमुदीची भूमिका सॅली फिल्ड या अभिनेत्रीने साक्षात जिवंत केली आहे. इराणला जाण्यापूर्वीची बेट्टी, इराणमध्ये पोचल्यावर मुदी कुटुंबात भेदरलेली अगतिक बेट्टी आणि शेवटी प्रचंड आत्मविश्वासाने निर्धार करून सुटकेचा प्रयत्न करणारी बेट्टी अशी विविधरंगी भूमिका सॅली फिल्डने अतिशय ताकदीने साकारली. प्रेक्षकांना या चित्रपटाने अनोखा आनंद दिला.