पंचवटी : तपोवनात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने प्रशासनाने सुरू केलेले कामकाज समाधानकारक आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शाहीमार्गात किरकोळ बदल करणार असून, याबाबत गुरुवारी अंतिम फैसला होऊन शाहीमार्गाची निश्चिती करणार असल्याची माहिती आखाडा परिषदेचे महंत ग्यानदास महाराज यांनी दिली.महंत ग्यानदास यांनी सकाळी जिल्हा प्रशासनातील अधिकारी, साधु-महंत यांच्यासमवेत तपोवनातील साधुग्रामच्या जागेची व तेथे सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. साधुग्रामकरिता तपोवनातील जागा योग्य असून, प्रशासनाकडे ३५0 एकर जागेची मागणी केली आहे. सध्या १00 एकर जागा प्रशासनाच्या ताब्यात आहे. उर्वरित जागा १५ दिवसांच्या आत ताब्यात घ्यावी, अशी मागणी प्रशासनाला केल्याचे ग्यानदास यांनी सांगितले.साधुग्रामच्या जागेत काम करताना अडथळे ठरतील असेच वृक्ष हटवा बाकी वृक्षांना हात लावू नका, असे सांगतानाच शेतकऱ्यांच्या जागा जबरदस्तीने घेणार नाही. तसेच शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ देणार नाही व त्रास देऊ नका, असे म्हणून शासनाने त्यांना जास्तीत जास्त मोबदला देण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. शाहीमार्ग हा जवळपास पूर्वीचाच राहणार असून, गत सिंहस्थात ज्या सरदार चौकात चेंगराचेंगरीची घटना घडली होती. त्या जागेचा मात्र विचार केला जाणार नाही. चेंगराचेंगरी झालेल्या जागेचे रुंदीकरण किंवा मग पूर्वीच्याच शाहीमार्गात किरकोळ बदल करून येत्या गुरुवारी शाहीमार्गाचा फैसला करणार आहे, असे ग्यानदास यांनी शेवटी सांगितले. या दौऱ्यात जिल्हाधिकारी विलास पाटील, आमदार बाळासाहेब सानप, महापौर अशोक मुर्तडक, उपजिल्हाधिकारी महेश पाटील, उदय किसबे, शहर अभियंता सुनील खुने, महंत भक्तिचरणदास आदिंसह अधिकारी सहभागी झाले होते.
गुरुवारी अंतिम फैसला होऊन शाहीमार्गाची निश्चिती
By admin | Published: January 05, 2015 1:18 AM